गडहिंग्लज तालुक्यातील चित्र, वीजबिल न भरल्यास कनेक्शन तोडण्याची धमकी, ग्राहकांतून तीव्र संताप व्यक्त
रोहित ताशिलदार / गडहिंग्लज
कोरोनाच्या खबरदारीसाठी देशासह राज्यात पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळातील घरगुती विजबिले माफ करावे अशी मागणी सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वच उद्योग, कंपन्या बंद असल्याने आर्थिक उलाढाल ठफ्प होती. त्यावेळी सर्वत्र आर्थिक नाकेबंदी असल्याने ग्राहकांनी घरगुती विजबिले भरण्याकडे दुर्लक्ष केले. अशातच शासनाच्या अस्पष्ट धोरणामुळे घरगुती विजबिले थकीत झाले आहेत. विविध सवलतीच्या घोषणा आणि थकबाकीमुळे ग्राहकांवर दबाव येत आहे. मार्च अखेरच्या पार्श्वभुमीवर गडहिंग्लज तालुक्यात घरगुती विज ग्राहकांच्यावर तगादा लावले जात असून विजबिले भरा अन्यथा विद्युत पुरवठा तोडण्याची धमकी दिली जात आहे. मते मागणारे लोकप्रतिनिधी आता कुठे आहेत ? असा सवाल ग्राहकांतून विचारला जात असून महावितरणने दबाव टाकून सुरु केलेल्या या वसुलीविरोधात ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील हसुरचंपू, तेरणी, हलकर्णी, बडय़ाचीवाडी, कडगाव, बटकणगले, दुंडगे, जरळी, बसर्गे, नेसरी, नरेवाडी, करंबळी, मुगळी, नूल, नांगनूर, भडगाव, शेंद्री, हनिमनाळ, हेब्बाळ, जख्खेवाडी, कौलगे, हिरलगे, महागाव आदी गावातील घरगुती आणि कृषीपंपाचे विजबिले थकीत आहेत. शासनाने कोरोनाच्या काळातील विजबिले माफ करावे यासाठी राज्यात अनेक आंदोलने, निदर्शने, तक्रारी सुरू आहेत. तर काही ठिकाणी कनेक्शन तोडण्याची प्रकार देखील घडले आहेत. कोरोना काळातील विजबिले माफ करावे यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात देखील विरोधकांनी जोर लावून धरला होता. यावर सरकारने काही आदेश काढले पण अधिवेशनाच्या शेवटी तोडणीला पुन्हा स्थगिती दिल्याने राज्यात पुन्हा महावितरणकडून वसुलीसाठी तगादा लावत बिले भरा अन्यथा विज कनेक्शन तोडणार असल्याची धमकी दिली जात आहे.
वीज ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे गरजेचे
कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे. प्रत्येकांना या परिस्थितीतून सावरताना नाकीनऊ होत आहेत. त्यातच भर म्हणून महावितरणने लाŸकडाऊन काळातील थकीत भरमसाठ वीज बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत. सरकारने मध्यतंरी सवलतीचे गाजर दाखवले होते त्यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा घुमजाव करत बील न भरणाऱयांचे कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे वीज ग्राहकांना ‘शाŸक’ बसला. विरोध झाल्यानंतर वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेशही देण्यात आहे. मात्र पुन्हा यू टर्न घेत वीज पुरवठा तोडण्याचे आदेश देण्यात आले. सरकारने आदेश दिल्याने महावितरणने वसुली मोहीम जोरात चालविली आहे खरे मात्र सध्याची परिस्थिती पाहता अव्वाच्या सव्वा पद्धतीने आलेली घरगुती बिले ग्राहकांना एकरकमी भरणे शक्य नाही. मात्र वसुली कर्मचाऱयांकडून कनेक्शन तोडण्याची धमकी देत वसुली करण्याचे सत्र सुरु आहे. वसुली करावी मात्र ग्राहकांना विश्वासात घेवून त्यांना सौजन्याची वागणूक देवून करणे अपेक्षित आहे. अशी भावना ग्राहकांतून व्यक्त होत आहे.