स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता रणजित बागल यांची टिका
वार्ताहर / पंढरपूर
महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणुन जी घोषणा केलेली आहे ती म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांची सरकारकडुन केलेली चेष्टा आहे. एकीकडे अतिवृष्टीने राज्यभरातील शेतकऱ्यांची काढणीसाठी आलेली सोन्यासारखी पिके वाहुन गेली आहेत. संपुर्ण हंगाम वाया गेला आहे. शेतकऱ्यांना निसर्गाने हतबल केले आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रवक्ता रणजित बागल यांनी केली आहे.
या अत्यंत तोकड्या मदतीतून शेतकऱ्यांचे नुकसान तर भरून निघणारच नाही उलट अतिवृष्टीने खराब झालेली शेतशिवारे यांची दुरूस्ती देखील शक्य नाही. सरकारकडे आर्थिक चणचण आहे हे मान्य आहे परंतु कोणतेही सरकार कितीही अडचणीत असले तरी शेतकरी हा खरा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो अडचणीत असेल तर अर्थव्यवस्था देखील ताळ्यावर राहणार नाही म्हणूनच शेतकऱ्यांना भरीव मदत देवुन त्यांना दिलासा देणे गरजेचे होते. येत्या काळात भरीव मदत न केल्यास राज्यभरातील शेतक-यांसोबत स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल व शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागेल.









