हिंडलगा गावातील इतर ठिकाणच्या कचऱयाची स्वच्छता करण्याची कर्मचाऱयांना सूचना : ग्रामस्थांतून समाधान

वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा येथे शंभर वर्षानंतर झालेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेमुळे संपूर्ण ग्रामस्थ व परिसरातील भाविकांना ‘न भूतो, न भविष्यती’, याप्रमाणे अभूतपूर्व अशी भव्य यात्रा पाहावयास मिळाली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पण पाच दिवस झालेल्या या यात्रेमुळे मोठय़ा प्रमाणात कचरा गावभर साठला असून रविवार दि. 21 रोजी ग्रामपंचायत सदस्यांनाच पुढाकार घेऊन श्रमदानातून साफसफाई करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले आहेत.
यात्रेपूर्वी श्री लक्ष्मी देवी यात्रोत्सव संघ व ग्रामपंचायतीच्यावतीने नागरिकांना घरगुती कचरा रस्त्याकडेला न टाकता स्वतःच्या कचऱयाची स्वतःच विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरीदेखील नागरिकांनी याचे भान न राखता यात्रेला वापरलेल्या पत्रावळय़ा, प्लास्टिक ग्लास आदी साहित्य प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रस्त्याकडेला असलेल्या कचराकुंडय़ांजवळ आणून टाकला आहे. परिणामी ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे निर्माण झाले असून तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याची पाहणी करून ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर, उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर व सर्व सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने रविवारी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रारंभी श्री महालक्ष्मी देवी गदगेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर गावात इतर ठिकाणी जमलेल्या कचऱयाची देखील विल्हेवाट लावण्यासाठी पंचायतीच्या कर्मचाऱयांना सूचना करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी दिली आहे.
स्वच्छता मोहिमेत श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर, ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य रामचंद्र मन्नोळकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेतले. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.









