प्रतिनिधी/ चिकोडी
चिकोडी व निपाणी तालुक्यातील द्ष्काळग्रस्त गावांसाठी वरदान ठरणारी महालक्ष्मी पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक वर्षापासून या ना त्या कारणाने प्रलंबित राहिली आहे. मात्र जलसंपदा मंत्री रमेश जारकिहोळी यांनी सदर योजनेस हिरवा कंदील दिला असून 375.60 कोटी रुपयांच्या खर्चाच्या या पाणी योजनेस लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. बेळगाव येथे शनिवारी मंत्री जारकिहोळी यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांची बैठक घेतली.
सदर पाणी योजनेमुळे चिकोडी व निपाणी या दोन तालुक्यातील खडकलाट, नाईंग्लज, नवलिहाळ, वाळकी, शिरगाव, संकणवाडी यासह डोंगराळ भागातील विविध गावांना लाभ होणार आहे. महालक्ष्मी पाणी योजनेसाठी अनेकवेळा केवळ आश्वासनेच देण्यात आली. मात्र मंत्री जारकिहोळी यांनी सदर योजनेस गती दिल्याने चिकोडी व निपाणी तालुक्यातील 17 गावांमधील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सदर योजनेंतर्गत चिकोडी तालुक्यातील कल्लोळ बंधाऱयापासून 1 कि. मी. अंतरावर असलेल्या दूधगंगा व कृष्णा नदीच्या संगमापासून पाणी उपसा होणार आहे. येथून चिंचली-गिरगाव दरम्यान पाणी चेंबर होणार आहे. येथून निपाणी-चिकोडी या मार्गाच्या दक्षिणेकडील शेतीला पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेनुसार चिंचली, गिरगाव, नाईंग्लज, कुठाळी, फुटाणवाडी, संकनवाडी, तपकारवाडी, खडकलाट, धुळगणवाडी, याद्यानवाडी, पीरवाडी, वाळकी, पट्टणकुडी, गवाण आदी विविध 17 गावातील 6 हजार 400 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
कल्लोळ बंधाऱयासही मिळणार मंजुरी
सदर बैठकीत कल्लोळ बंधाऱयाच्या दुरवस्थेबाबतही चर्चा झाली. हा बंधारा पूर्णपणे जीर्ण झाल्याने येथे पाणी थांबण्यास अडचणी आहेत. त्यामुळे येथे नव्या बंधाऱयाच्या निर्मितीसाठी 35 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. त्यालाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.









