सरकारचा निर्णय : मात्र काही अटी लागू
प्रतिनिधी /बेंगळूर
महाराष्ट्रात गेलेले कर्नाटकातील नागरिक दोन दिवसांत आपल्या घरी परतणार असतील तर त्यांच्यासाठी कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीची अनिवार्यता रद्द करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने मंगळवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय घोषित करून महाराष्ट्रात जाणाऱया आपल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे सचिव टी. के. अनिलकुमार यांनी ह आदेश जारी केला आहे.
आरटीपीसीआर चाचणीची अनिवार्यता रद्द करताना काही अटीही लागू केल्या आहेत. त्यानुसार परतणाऱया नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असले पाहिजे. तसेच दुसरा डोस घेऊन झाल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असला पाहिजे. तसेच परतणारा नागरिक कोरोनाच्या लक्षणांपासून (ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, श्वास घेण्यास अडचण इ.) मुक्त असला पाहिजे. परतलेल्या नागरिकांना 7 दिवस कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून त्याने 7 दिवसांपर्यत आपल्या प्रकृतीवर स्वतः लक्ष ठेवले पाहिजे. परतल्यानंतर कोरोनाचे लक्षण दिसून आल्यास त्वरित कोविड चाचणी करून घेतली पाहिजे. महाराष्ट्रातून परतलेल्या नागरिकाने महाराष्ट्रात दोन दिवस वास्तव्य केल्याचे दर्शवून देण्यासाठी प्रवासाचे अधिकृत तिकीट किंवा कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.