ऑनलाइन टीम / मुंबई :
राज्यातील जवळपास १९ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने राज्यात नव्याने कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार ३१ मार्च अखेर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. याचा राज्यातील थेट १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
पुढे ते म्हणाले, जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून राज्य
सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजने अंतर्गत १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५४०७ कोटी १३ लाख रूपये जमा करण्यात आले. तसेच व्यापारी बॅंकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रूपये जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार, कंपन्या, बाजारपेठा ठप्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे देखील नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले कर्जमाफीचे पैसे नक्कीच काही प्रमाणात दिलासा देणारे आहेत.









