ऑनलाईन टीम / मुंबई :
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र असलेल्या 32.90 लाख शेतकऱ्यांपैकी 27 लाख 38 हजार शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. यासाठी 17 हजार 646 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे म्हणजेच योजनेअंतर्गत पात्र खातेदारांच्या यादीतील 83 टक्के खातेदारांना लाभ देण्यात आला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्ती साठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 21 हजार 467 कोटी रुपयांची आवश्यकता होती त्यापैकी 17 हजार 646 कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे.
योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये तसेच बँकांच्या शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यापैकी 2019-20 या आर्थिक वर्षात जवळजवळ 19 लाख खातेदारांना 11 हजार 993 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता. तर 2020-21 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत एकूण 5 हजार 653 कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे.









