ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्य सरकारने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. तसेच ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज राज्यातील रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. त्यावेळी तेे बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सध्या संपूर्ण देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आणि अनलॉकमध्ये काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्या. लॉकडाऊनला सहा महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अजूनही राज्यात अनेक गोष्टी बंद आहेत. त्यात रेस्टॉरंट देखील आहेत.
कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे कोरोनासोबत जगतांना अत्यंत काळजीपुर्वक पुढे जावे लागत आहे. कोरोना रोखण्यासाठी खबरदारी घेतली गेली तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेस्टॉरंट सुरू केली जातील मात्र, एकदा रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर ती पुन्हा बंद करावी लागणार नाहीत याची काळजी हॉटेल मालक आणि चालकांवर राहील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
- माझे कुटुंब माझी जबाबदारी… तशीच तुमचीही
राज्य शासनाने माझे कुटुंब- माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायिक ही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकासाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.









