ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्राकडून मदत केली जात आहे. पण हवी तशी मदत मिळत नाही आहे. महाराष्ट्रात रुग्ण संख्या जास्त आहे. असे असताना देखील राज्याला लस कमी का? असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी उपस्थित केला.
ते म्हणाले, मी हर्षवर्धन यांच्याशी बोललो, पवार साहेब आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोललो. सद्य स्थितीत आम्हाला आठवड्याला 40 लाख लसींची आवश्यकता आहे. त्यामुळे ती दिली जावीत. मला कुणाशी वाद घालायचा नाही. मला कोणाला दोष द्यायचा नाही. मात्र, महाराष्ट्राला केवळ साडे सात लाख आणि इतर राज्यांना जास्त लसी का? महाराष्ट्राबाबत हा दूजाभाव का ? असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. परंतु गुजरातला आतापर्यंत एक कोटी लसी मिळाल्या आहेत. तर त्या तुलनेत महाराष्ट्राला कमी डोस मिळाले आहेत. आम्हाला दर आठवड्याला किमान 40 लाख डोस हवे आहेत. इतर देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्यापेक्षा आपल्या राज्यांना त्याचा पुरवठा करावा, असे राजेश टोपे यांनी यावेळी नमूद केले.
महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. त्यामुळे दहा लाख हा मानांक आहे. आम्ही पारदर्शक पद्धतीने कारभार करत आहोत. चाचणी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करतोय. महाराष्ट्र 70 टक्के आरटीपीसीआर आणि 30 टक्के अँटिजेन टेस्ट करतो. उत्तर प्रदेशात 90 टक्के अँटिजेन टेस्ट होतात.
ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी फक्त 7.5 लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश 48 लाख, मध्य प्रदेश 40 लाख, गुजरातला 30 लाख, हरियाणाला 24 लाख अशा पद्धतीने लसींचे वाटप झाले आहे. या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही त्याची वाट पाहात आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.








