ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या हजारच्या वर पोहचली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात लॉक डाऊनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. उध्दव ठाकरे म्हणाले, आकाश पांघरून जग शांत झोपले आहे. आपण सगळे घरात आहेत… पण जनतेची झोप उडाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. विशेषतः मुंबईमध्ये रुग्ण वाढत आहेत. मुंबईतील ज्या भागात रुग्ण सापडत आहेत. तो भाग सील करण्यात आला आहे. आता घरोघरी जाऊन लोकांची टेस्ट केले जात आहे. रुग्णांची चेन करण्यासाठी महापालिका काम करत आहे. कोरोनाग्रस्तांची लक्षणे सौम्य आहेत, मात्र आपल्याला गाफील राहून चालणार नाही. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यभरात आज सकाळपर्यंत आत्तापर्यंत 33 हजार टेस्ट करण्यात आल्या तर मुंबईत तब्बल 19 हजार लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत.
मुंबई-पुण्यात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जर आपण स्वयंशिस्त पाळली तर ही साखळी तुटेल. त्यामुळे प्रत्येकाने शिस्त पाळली पाहिजे. शिस्त पाळायची म्हणजे काय तर कोणीही घराबाहेर पडू नये. अगदीच इमर्जन्सी आली तर मास्क घालून पडले पाहिजे. काही ठिकाणी बंधन आवश्यक आहेत आणि ती पाळणे देखील तेव्हढेच महत्वाचे आहे तसेच हे युद्ध आपण जिंकणारच, आपण जिंकून दाखवणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.









