ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने शिथिलता दिली जाणार आहे. या संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करून माहिती दिली.

दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला त्यावेळी 30 जून नंतरही लॉक डाऊन उठवणार नाही असे म्हटले होते. मात्र, राज्यात दररोज 5 हजाराच्या संख्येने रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे पुन्हा 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे 30 जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.
मिशन बिगीन अगेनच्या दुसऱ्या टप्प्यात देखील मिशन बिगिन अगेनच्या पहिल्या टप्प्यात ज्या अटी-शर्ती होत्या त्या कायम ठेवल्या गेल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 जुलै रात्री 12 पर्यंत लॉकडाऊन कायम असेल. तसेच अत्यावश्यक दुकानं आणि ऑड-इव्हन नियमानुसारची नियमावली, सरकारी आणि खासगी कार्यालयांची नियमावली ही कायम राहणार आहे. तसेच राज्यात 31 जुलैपर्यंत जिल्हाबंदी आणि एसटी सेवा ही बंद असेल.









