ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाला रोखण्यासाठी 24 तास ऑन ड्युटी कार्यरत असलेल्या राज्यातील 1671 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 18 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका वाढत आहे. राज्यातील 1671 कोरोनाबाधित पोलिसांमध्ये 174 अधिकारी आणि 1497 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत 541 पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईतील जे जे पोलीस ठाण्यात 45 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधील 18 पोलीस पूर्णपणे बरे होऊन ते कामावर रुजू झाले आहेत. आणखी चार जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, लॉकडाऊन काळात पोलीस यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, एका तुकडीत 100 जवान आहेत.









