खेलो इंडिया युथ गेम्स ः तेलंगणा संघावर 48 गुणांनी मात
वृत्तसंस्था/ इंदोर
सलामीच्या पराभवातून सावरलेल्या महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने सोमवारी खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये धडाकेबाज विजयाची नोंद केली. राष्ट्रीय खेळाडू हरजीत कौर, मनीषा, ऋतिका यांनी लक्षवेधी कामगिरी करत महाराष्ट्राला गटातील दुसऱया सामन्यात मोठा विजय मिळवून दिला. युवा कर्णधार निकिता लंगोटेच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र संघाने दुसऱया सामन्यात तेलंगणाचा 48 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्र संघाने 64-16 अशा फरकाने दुसऱया सामन्यात बाजी मारली.
यादरम्यान सकाळच्या सत्रात वैभव रबाडेच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाला गटातील दुसऱया लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान संघाने अवघ्या एका गुणाच्या आघाडीने महाराष्ट्रावर मात केली. राजस्थान संघाने 28-27 ने सामना जिंकला.
पहिल्या हाफमध्येच 31 गुणांची आघाडी
उत्कृष्ट रेडर हरजित, मनीषा आणि ऋतिका यांनी महाराष्ट्र संघाला दमदार सुरुवात करून देत पहिल्या हाफ मध्येच मोठी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे महाराष्ट्र संघाने मध्यंतरापूर्वी 31 गुणांची आघाडी घेतली होती.. यादरम्यान महाराष्ट्राने 37-6 असा स्कोअर केला होता. त्यामुळे तेलंगणा संघाला गुण संपादन करण्याची संधीच मिळाली नाही अवघ्या सहा गुणांची कमाई करत हा संघ पराभवाच्या गर्तेत सापडला होता. दणदणीत विजयाच्या इरादांनी मैदानावर उतरलेल्या महाराष्ट्र महिला संघाने शेवटच्या मिनिटापर्यंत सुरेख खेळ केली. त्यामुळे प्रत्येक चढाई आणि अचूक पकडीतून महाराष्ट्र संघाला मोठय़ गुणांची कमाई करता आली. आपला धबधबा कायम ठेवत महाराष्ट्र संघाने दुसऱया हात मध्ये सतरा गुणांची आघाडी घेतली होती. यादरम्यान 27-10 असा स्कोअर होता. यातून महाराष्ट्र संघाला मोठा विजय साजरा करता आला. महाराष्ट्र संघाविरुद्ध खेळताना तेलंगणा महिला संघाची मोठी दमछाक झाली. तेलंगणा संघाला सामन्यात फक्त 16 गुणांची कमाई करता आली.
यजमान मध्य प्रदेश संघांसमोर महाराष्ट्राचे आव्हान
महाराष्ट्र महिला व पुरुष संघ आता उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यादरम्यान यजमान मध्य प्रदेश संघाला मंगळवारी फार्मात असलेल्या महाराष्ट्राच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश संघात महिला व पुरुष गटातील सामने रंगणार आहेत.
वेटलिफ्टिंगगमध्ये मनमाडच्या खेळाडूंची विक्रमासह पदकांना गवसणी

सोमवारी वेटलिफ्टिंगच्या वीणाताई आहेर आणि आकांक्षा व्यवहारे या मनमाडच्या खेळाडूंनी महाराष्ट्राच्या पदकांचा भार सहजपणे उचलला. वीणाताईने राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर आकांशा व्यवहारेने पदार्पणात सोनेरी यश मिळविले. वीणाताई आहेर हिने स्न्ँचमध्ये 57 आणि क्लिन अँड जर्क प्रकारात 72 असे एकूण 129 किलो वजन उचलून सुवर्णपदकाचा मान मिळविला. दोन्ही प्रकारात तिसऱया प्रयत्नांत तिने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. वीणाने दुसऱया क्रमांकावरील ज्योत्स्ना साबर (118) आणि प्रितीस्मिता भोज (117) या ओडिशाच्या दोघींना मोठय़ा फरकाने मागे टाकले. वीणाने या स्पर्धेत क्लीन ?ण्ड जर्क प्रकारात आपली कामगिरी उंचावताना थेट राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली. वीणाताईने आकांक्षा व्यवहारेच्या 71 किलो वजनाचा विक्रम एका किलोने मोडीत काढला. आकांक्षाने गेल्यावषी मोदीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या विक्रमाची नोंद केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात आकांक्षाने 45 किलो गटात स्नचमध्ये 67 आणि क्लिन अँड जर्कमध्ये 77 असे 144 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले.
नेमबाजीत सानियाचा कांस्यपदकाचा वेध
कोल्हापूर जिह्यातील गारगोटी येथील खेळाडू सानिया सापले हिने 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कास्यपदकाचा वेध घेतला. सानिया हिचे खेलो इंडिया मधील हे पहिलेच पदक आहे. आतापर्यंत झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा?मध्ये तिने जवळजवळ पन्नास पदकांची कमाई केली आहे. त्यासाठी आवश्यक असणारे कष्ट करायची तिची तयारी आहे. ती कोल्हापूर आणि नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी वैयक्तिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.? ती कोल्हापूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.महाराष्ट्राला नेमबाजीत येथे एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई झाली.









