ऑनलाईन टीम / जळगाव :
राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच आता राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुलाबराव पाटील यांनी संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती, असे म्हटले आहे.
दरम्यान, याआधी ठाकरे सरकारमधील 25 पेक्षा अधिक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख, छगन भुजबळ, प्राजक्ता तनपुरे, बच्चू कडू, सतेज पाटील आदींना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात आता गुलाबराव पाटील यांची भर पडली आहे.








