महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्र्यांकडे सुरू आहे सातत्याने पाठपुरावा
संग्राम काटकर / कोल्हापूर
महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट अजिक्यंपद कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेने उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकुरीया यांच्याकडे लावून धरली आहे. त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून जे काही निर्देश मिळतील, त्याचप्रमाणे फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करू शकतो, अशा आशयाची निवेदनेही दिली आहेत. शासनाकडून आज ना उद्या ग्रीन सिग्नल मिळेल, याची प्रतिक्षा करत कुस्ती स्पर्धा कुठे घ्यायची याच्या नियोजनाला सुरूवात केली जाईल, असे परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.
देशातील कोरोना संसर्गाचे घटत चाललेले प्रमाण लक्षात घेऊन अखिल भारतीय कुस्ती महासंघाने कुस्ती स्पर्धा आयोजनास परवानगी दिली आहे. ती देत असताना स्पर्धा आयोजनासाठी आपापल्या राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे गांभिर्याने पालन करावे, अशी सुचनाही स्पर्धा आयोजकांना केली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेने महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट अजिक्यंपद कुस्ती स्पर्धा आयोजनासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री आणि राज्याचे क्रीडा आयुक्त यांना निवेदन दिले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत शासनाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यास फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात शासनाचे निर्देश पाळून स्पर्धा आयोजित केली जाईल, असेही परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले होते.
राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटत चालले आहे, ही जरी जमेची बाजू असली तरी धोका मात्र टळलेला नाही. याची जाणिव ठेवूनच कुस्तीगीर परिषदेला महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट अजिक्यंपद कुस्ती स्पर्धेचे नियोजन करावे लागणार आहे, असे लांडगे यांनी सांगितले. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व कुस्तीगीर परिषदचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पर्धा आयोजनास ग्रीन सिग्नल मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. स्पर्धेसाठी आज ना उद्या ग्रीन सिग्नल मिळेलच, यात शंका नाही. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोकळ्या मैदानात स्पर्धा आयोजित करणे केंव्हाही धोक्याचे ठरेल. त्यामुळे स्पर्धा इनडोअरलाच आयोजित केली जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीतच होईल, असेही लांडगे यांनी सांगितले.
वजन घटवत मल्ल करताहेत मेहनत…
कोरोनामुळे राज्यातील सर्व आखाडे 9 महिने बंद होते. त्यामुळे मल्लांना माती आणि मॅटवरील कुस्तीच्या डावपेचांचा सराव करता आला होता. अपेक्षेप्रमाणे रोज मेहनतही न करता आल्याने त्यांचे अनेक वजन वाढले. आता राज्यातील कोरोनाचे प्रमाण घटत चालल्याचे पाहून शासनाने आखाडे खुले करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मल्ल आधुनिक पद्धतीच्या व्यायामाद्वारे वाढलेले वजन कमी करत आहेत. तसेच 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 या वजन गटात कुस्तीगीर परिषदेच्या आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेत लढण्यासाठी सर्व बाजूंनी तयारीही करू लागले आहेत.
संभाजीराव वरूटे. (रा. आरे, ता. करवीर) (उपाध्यक्ष ः महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद)









