प्रशिक्षक काका पवार यांचा आरोप, 20 हजाराच्या रकमेतच गटातील मल्लांना गुंडाळले
पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आयोजकांनी मोठय़ा बक्षीस रकमेची घोषणा केली होती. मात्र. प्रत्यक्षात महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवधन सदगीर याला महाराष्ट्र केसरी किताबाची मनाची चांदीची गदा वगळता कुठलेही रोख पारितोषिक मिळलेले नाही. इतरांनाही घोषित रोख रकमा मिळालेल्या नाही, असा गंभीर आरोप अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, उपविजेता शैलेश शेळके आणि दोघांचे प्रशिक्षक काका पवार यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत हेते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, चंद्रकांत हंचाटे उपस्थित होते.
काका पवार म्हणाले, यंदा झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वरि÷ वजन गटात काका पवार यांचे चेले माती आणि गादी गटात सुवर्णपदक विजेते झाले, तर महाराष्ट्र केसरीची गदादेखील काका पवार यांचा चेला हर्षवर्धन सजगिर याने पटकावली. यंदा ही स्पर्धा सिटी ग्रुप सारख्या मोठय़ा उद्योग समूहाने प्रायोजित केली होती तसेच महाराष्ट्र केसरी विजेत्याला दीड लाख रूपयाचे बाक्षिस जाहीर केले होते. पुढील पाच वर्षांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात करण्याचा करारदेखील सिटी ग्रुपने केला आहे. मात्र, विजेत्यासाठी घोषित रक्कम विजेत्यांना अद्याप मिळालेली नाही. हर्षवर्धनला केवळ सुवर्ण पदक विजेत्यासाठीचे 20 हजार देण्यात आले, तर माती गटात सुवर्णपदक विजेता असलेल्या शैलेश शेळकेला मात्र अद्याप कुठलीही रोख रक्कम मिळालेली नाही.
हर्षवर्धन पुढील महाराष्ट्र केसरी खेळणार नाही
महाराष्ट्र केसरी ही किताबाची लढत आहे. महाराष्ट्रात या स्पर्धेला मान आहे. मात्र, कुस्तीपटूंनी फक्त महाराष्ट्र केसरी या किताबातच स्वतःला अडकवून ठेवू नये, राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकडे लक्ष द्यावे. नाहीतर भविष्य अंधारात जाईल, असा इशाराही पवार यांनी दिला. हर्षवर्धन याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला, त्याच वेळी मी त्याला आता हे विसरून पुढील तयारीला लागण्याचा सल्ला दिला. हर्षवर्धन आता पुढील महाराष्ट्र केसरी खेळणार नाही. तो ऑलिंपिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करेल. तर उपविजेता शैलेश शेळके मात्र पुढील महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुस्तीपटूंनी ‘महाराष्ट्र केसरी’ न थांबता ऑलिम्पिक खेळावे
महाराष्ट्र् केसरी विजेत्या मल्लांची परंपरा बघितली तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कुस्तीपटू पुढे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळताना दिसतात, किताब पटकावल्यानंतर एक वर्ष तुम्हाला मानसन्मान, काही प्रमाणात पैसा मिळतो. मात्र पुढे काय, हा प्रश्न आहे. पुढच्या वषी नवीन महाराष्ट्र केसरी होतो आणि मागच्याला लोक विसरून जातात. नंतर अनेक कुस्तीपटू पुढील दिशा न ठरवल्याने भविष्य अंधकारात गेल्याची उदाहरणे आहेत. कुस्तीपटूंनी ‘महाराष्ट्र केसरी’वर न थांबता नॅशनल, एशियन आणि ऑलिम्पिकमध्ये खेळावे. कुठे नोकरी मिळाली नाही, तर कुस्तीगीरांवर आर्थिक संकट ओढवते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हरियाणात होते, ते महाराष्ट्रात होत नाही
कुस्ती खेळाला महाराष्ट्रात मान आहे. मात्र, अजूनही या खेळाला आर्थिक पाठबळ मिळत नाही, हरियाणासारख्या छोटय़ा राज्यात कुस्तीपटूंना पदक जिंकल्यावर थेट नोकरी मिळते. तसे महाराष्ट्रात होताना दिसून येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कुस्ती हा आपल्या मातीतील खेळ आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्तीला पुढे न्यायचे असेल, तर उद्योगपती, सरकार, तरुण मल्ल, कुस्तीगीर परिषद या सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
2024 मध्ये होणाऱया ऑलिंपिकची तयारी करणार : सदगीर
‘महाराष्ट्र केसरी’ जिंकल्यामुळे माझे गुरू, आई-वडील यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता 2024 मध्ये होणाऱया ऑलिंम्पिकची तयारी करायची आहे, असा निर्धार त्याने व्यक्त केला, तर ‘आता देशासाठी मेडल मिळवायचे आहे,’ अशी आशा ‘महाराष्ट्र केसरी’ उपविजेता शैलेश शेळके याने व्यक्त केली.
बक्षिस रक्कम अदा केली : ललित लांडगे
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे म्हणाले, 2 ते 7 जानेवारी, 2020 दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा सर्व खर्च यंदा पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक सिटी कॉर्पोरेशनने उचलला होता. ज्यामध्ये प्रत्येक वजनी गटातील सुवर्णपदक विजेत्यास 20 हजार, रौप्य पदक विजेत्यास 10 हजार व कांस्यपदक विजेत्यास 5 हजार रोख बक्षिस देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे स्पर्धेदरम्यान झालेल्या प्रत्येक बक्षिस समारंभात बक्षिसाची रक्कम अदा करण्यात आली आहे. स्पर्धेतील महाराष्ट्र केसरी विजेता व उपविजेता मल्लास त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अधिक बक्षिसे जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या संबंधीची कोणतीही अधिकृत घोषणाही करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.