कोल्हापूर प्रतिनिधी
साताऱ्यात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत प्रथमच सहभागी होऊन महाराष्ट्र केसरीची मानाची गदा जिंकून कोल्हापूरचा लौकिक वाढवलेला मल्ल पृथ्वीराज पाटील याचा कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने येत्या शुक्रवारी नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तुळजा भवानी मंडपात सकाळी 10 वाजता हा सत्काराचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संभाजीराजे छत्रपती व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जिह्यातील कुस्ती शौकिन, वस्ताद, क्रीडाप्रेमी, पंच व मल्लांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील व सरचिटणीस महादेवराव आडगुळे यांनी केले आहे.