फिरोज मुलाणी/ औंध
कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा वस्ताद खासदार शरद पवार यांनी घेतलेल्या कंडका निर्णयामुळे सातारला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनावरुन संघटनेतील वादाचा उडालेला धुरळा आता बसला आहे. स्पर्धेच्या आयोजनाची धुरा जिल्हा तालिम संघाकडे देण्यात आली आहे. कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून मानाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तालिम संघ तयारीला लागला आहे.
गेल्या आठवडय़ात महाराष्ट्र केसरी कुस्ती आयोजनाबाबत जिह्यातील कुस्ती आखाडय़ात बराच गदारोळ झाला होता. स्पर्धा आयोजनावरुन दोन्ही गटांनी परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना भेटून बाजू मांडली होती. त्यामुळे परिषदेचे वस्ताद काय निर्णय घेणार याबाबत ट्विस्ट निर्माण झाले होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक म्हणून जबाबदारी घेतलेल्या सिटी कार्पोरेशन कंपनीने आयोजनातून काढता पाय घेतला आहे. ऐनवेळी स्पर्धा सातायातून जातेय कि काय अशी स्थिती निर्माण झाली होती. स्पर्धेसाठी अंदाजे दोन कोटी रुपये खर्च येणार आहे. स्पर्धा सातारला झाली पाहिजे याकरीता जिल्हा तालिम संघाने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दर्शवली. सातारा जिह्यावर विशेष प्रेम करणाऱया खा. पवार यांनी सातारलाच स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारणी आणि जिल्हा तालिम संघ यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या चर्चेनुसार स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी जिल्हा तालिम संघाकडे देण्याचा कंडका निर्णय परिषदेचे वस्ताद खा. शरद पवार यांनी घेतला आहे. 4 एप्रिल ते 9 एप्रिल अखेर सातारच्या छ. शाहू स्टेडियमवर स्पर्धा होणार यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.
1963 साली महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाण, स्व. बाळासाहेब देसाई, ऑलिम्पिकवीर स्व. श्रीरंगआप्पा जाधव आणि तालिम संघाचे विद्यमान अध्यक्ष साहेबराव पवार यांनी शाहू कलामंदिर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पाडली होती. तब्बल 60 वर्षांनंतर साहेबराव पवार (भाऊ) यांनी ही स्पर्धा सातारा शहरांमध्ये पार पाडण्यासाठी चंग बांधला होता. नव्या उमेदीने कार्यकारणीचे सर्व संचालक व तालीम संघ स्पर्धा पार पाडणार आहे. जिह्यातील कुस्तीशौकिनांना स्पर्धेचा निर्भेळ आनंद लुटता येणार आहे.
दिपकबापूंची शिष्टाई फळाला
जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांचे जिह्यातील कुस्तीसाठी मोठे योगदान आहे. सातारला आपल्या कारकिर्दीत मानाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी ही भाऊंची इच्छा होती. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भाऊंच्या तालमीत घडलेले त्यांचे सुपुत्र दिपकबापूंनी खा. शरद पवार यांच्याकडे केलेली शिष्टाई आणि सुधीरनानांचे प्रयत्न फळाला आले आहेत. निर्णायक स्थितीत खा. पवार यांचे मन वळवण्यात दिपक बापूंना यश आल्यामुळे कोल्हापूरला चाललेली स्पर्धा आता तालिम संघाच्या आयोजनातून सातारलाच होत आहे.
स्वतः अध्यक्ष घेणार बैठक
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबद्दल परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार दिनांक 25 ते 27 च्या दरम्यान तालीम संघ सातारा येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची कुस्ती अधिवेशनासाठी संयुक्त बैठक घेणार आहेत. यावेळी स्पर्धा कार्यक्रम निश्चित करुन स्पर्धेच्या तयारीचा आढावा देखील घेण्यात येणार आहे.








