सुशांत कुरंगी/ बेळगाव
दक्षिण महाराष्ट्र व कर्नाटकाला जोडणारी रेल्वे म्हणून राणी चन्नम्मा एक्स्प्रेसचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. बेळगावमधील अनेक प्रवाशांनी एकदा तरी या रेल्वेतून प्रवास हा केलेलाच आहे. नैर्त्रुत्य रेल्वेची सर्वाधिक लोकप्रिय असणारी ही एक्स्प्रेस महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रवाशांची मागील 25 वर्षांपासून सेवा करीत आहे. त्यामुळेच या रेल्वेसोबत अनेक प्रवाशांचे जिव्हाळय़ाचे नाते निर्माण झाले आहे.
15 ऑगस्ट 1995 रोजी बेंगळूर ते मिरज या दरम्यान ही रेल्वे पहिल्यांदा धावली होती. मिरज, बेळगाव, हुबळी, धारवाड येथील नागरिकांना रात्रीचा प्रवास करून सकाळी बेंगळूरला पोहचणे उपयुक्त ठरत होते. त्यामुळे अल्पावधीतच ही रेल्वे लोकप्रिय ठरू लागली. बेळगावमधील अनेकजण कामधंदा तसेच व्यवसायानिमित्त बेंगळूर येथे असल्याने त्यांच्यासाठी ही रेल्वे लाभदायक ठरली. 2002 मध्ये ही रेल्वे कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वेस्थानकातून धावू लागली.
असे झाले रेल्वेचे नामकरण
ही रेल्वे पहिले काही दिवस नाव नसताना धावत होती. त्यानंतर काही दिवसांनी कित्तूर एक्स्प्रेस असे नाव या रेल्वेला देण्यात आले. बेळगाव शहरापासून काही अंतरावर असणाऱया कित्तूर संस्थानच्या राणी चन्नम्मांचे नाव या रेल्वेला देण्याची मागणी जोर धरू लागली. तुमकूरचे तत्कालिन खासदार जी. एस. बसवराजू यांनी या रेल्वेला चन्नम्मांचे नाव देण्याची मागणी संसदेत केली. रेल्वे विभागाने या मागणीला मंजुरी दिल्यामुळे या रेल्वेचे नाव ‘राणी चन्नम्मा एक्स्प्रेस’ असे करण्यात आले.
कोल्हापूर ते बेंगळूरदरम्यान धावणारी ही रेल्वे एकूण 797 किलोमीटरचा प्रवास करते. 16 तास 25 मिनिटांनी रेल्वे बेंगळूरला पोहचते. कोल्हापूर, मिरज, कुडची, रायबाग, गोकाक, बेळगाव, खानापूर, अळणावर, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरी, तुमकूरमार्गे ही रेल्वे बेंगळूरला पोहचते. बेळगावमधून बेंगळूरला पोहचायचे असल्यास ही एकच रेल्वे तेव्हा उपलब्ध होती. त्यामुळे सायंकाळी 7 वा. बेळगावमध्ये दाखल होणारी रेल्वे सकाळी 7 वा. बेंगळूरला पोहचायची.
सुरेश अंगडी (केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री)
कोल्हापूर ते बेंगळूर धावणारी कित्तूर राणी चन्नम्मा एक्स्प्रेस 25 वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेत आहे. या रेल्वेसोबत अनेकांचे जिव्हाळय़ाचे नाते निर्माण झाले आहे. मीदेखील याच रेल्वेने बेंगळूर गाठत होतो. त्यामुळे या रेल्वेच्या निमित्ताने अनेक आठवणींना उजाळा मिळाल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सांगितले.









