युवा समितीचा बैठकीत निर्धार : 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱया सायकल फेरीमध्येही सहभागी होण्याचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱया महामोर्चामध्ये मोठय़ा संख्येने युवक सहभागी होऊन विराट दर्शन घडविणार आहेत. तसेच मराठी जनतेवर होणाऱया अन्यायाविरोधात आपली चिड व्यक्त करण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱया सायकल फेरीमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या जत्तीमठ येथील बैठकीत घेण्यात आला.
आज अनेक ब्रॅण्ड आपले शोरूम घेऊन बेळगावमध्ये दाखल होत आहेत. परंतु त्यांच्या दुकानांवर मराठीचा उल्लेखही नाही त्यामुळे ज्या दुकानांवर मराठी पाटय़ा असतील त्याच दुकानांमध्ये व्यवहार करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच घरोघरी मराठी पाटय़ा लावण्याची मागणी माजी नगरसेवक राजु बिर्जे यांनी केली. महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदारांनी काळा दिन पाळून केंद्रसरकारचा निषेध करावा असेही आवाहन करण्यात आले.
कोल्हापूर येथील धरणे आंदोलनाला पाठिंबा
जो कोणी सीमाप्रश्नासाठी काम करत आहे त्या प्रत्येकाच्या मागे युवा समिती उभी असेल. खानापूर तालुका म. ए. समिती 30 रोजी कोल्हापूर येथे दसरा चौकात धरणे आंदोलन छेडणार असून, या आंदोलनाला युवा समितीने पाठिंबा दिला आहे.
त्याचबरोबर सीमावासियांच्या व्यथा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले.
यावेळी कार्याध्यक्ष सुरज कुडुचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर व अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, प्रतिक पाटील, अश्वजीत चौधरी, संभाजी शिंदे, विजय हंडे, शशिकांत सडेकर, अनिल मराठे, सतिश जुटेकर, उमेश जाधव, अशोक सांडगे, किरण मोदगेकर, गुंडू कदम, निलेश भेकणे, सुदर्शन पाटील,प्रशांत दळवी, प्रवीण कोरणे, इंद्रजीत धामणेकर, आकाश भेकणे, रूपेशचौगुले यांच्यासह युवा समितीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.









