शरद बी. पवार/ वहागाव
आशियाई महामार्गावर प्रवास करताना आपले वाहन चालवताना आता वेगाची मर्यादा आवश्यक असणार आहे. वाहनाचा वेग ताशी 90 किलोमीटरच्या वर असल्यास ऑनलाईन एक हजार रुपये दंड होऊ शकतो. जिल्हय़ाच्या हद्दीत कराड, भुईंज आणि जिल्हा वाहतूक शाखेकडे तीन स्पीड गन कार तैनात असून या माध्यमातून दंडाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनेक वेगवान कारचालकांना हा दंड भरावा लागला आहे.
सातारा जिह्यामध्ये महामार्ग सुरक्षा पथक कराड यांच्याकडे एक, महामार्ग सुरक्षा पथक भुईंज यांच्याकडे एक व जिल्हा वाहतूक शाखेकडे एक अशा तीन स्पीड गन इरटिका गाडय़ा असून या गाडय़ा ऑनलाइन दंडाची अंमलबजावणी करत आहेत. जिह्यामध्ये महामार्गावर इरटिका स्पीडगन कार महामार्गाच्या कडेला उभ्या करण्यात येत आहेत. या कारमध्ये कॉम्प्युटर फ्लॅश कॅमेरा मशीन बसवले असून यावर कारचे स्पीड नोंद होते. कारचे स्पीड 90 किमीच्या वर गेल्यास कॅमेरात गाडी नंबर सेव्ह होऊन गाडी मालकास ऑनलाइन दंडाला सामोरे जावे लागते. या स्पीड लिमिट कारवाईच्या भीतीने वाहनांचे स्पीड कमी होणार असून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. महामार्गवर ट्रक, लक्झरी, इनोव्हा, फॉर्च्युनर, इंडीवर, स्कार्पिओ व इतर कार, टू व्हीलर यांचे स्पीडचे प्रमाण जास्त असते. महामार्गावर आत्तापर्यंत स्पीडची मर्यादा नव्हती. त्यामुळे अपघात होत असत. आता स्पीड लिमिट आल्यामुळे महामार्गावरील अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.
गृहखात्याची ही स्पीड लिमिट मर्यादा व ऑनलाईन कारवाई यामुळे वाहनांचे स्पीड कमी ठेवण्यासाठी एक जनजागृती ठरत आहे यातून महामार्गावरील स्टंट करणाऱया चालकांना चांगलाच आळा बसणार आहे. महामार्ग पोलीस नेहमीच अलर्ट असतात. महामार्ग पोलिसांनी स्थानिकांच्या सहकार्याने हायवे मृत्युंजय दूत योजना राबवून जखमींना तात्काळ मदत मिळावी, प्राणहानी थांबावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. दरम्यान स्पीड लिमिट कारवाईमध्ये सर्व वाहनांचा समावेश केला असून कोणत्याही वाहनास सवलत दिलेली नाही.
अपघातांचे प्रमाण कमी होईल
राज्य सुरक्षा समितीचे आदेश आहेत. महामार्गावरील दहा टक्के अपघात कमी करायचे आहे. जादा वेग असणाऱया गाडय़ांवर होणाऱया ऑनलाइन कारवाईमुळे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे. जादा वेग असणाऱया गाडय़ांना ऑनलाइन दंड होतो. कोणत्याही गाडीला आपण अडवून किंवा थांबवून केस करत नाही. अशा गाडीवर ऑनलाईन केस झाल्यास ती कॅन्सल करता येत नाही.
अस्मिता पाटील
एपीआय, महामार्ग वाहतूक शाखा कराड








