प्रतिनिधी/ चिपळूण
परशुराम घाट रुंदीकरणाचे काम गतिमान होण्यासाठी घाटातील वाहतूक सहा तास बंद निर्णयाच्या अंमलबजावणीला सोमवारपासून प्रारंभ झाला. यामुळे घाटात यंत्रसामुग्रीची घरघर सुरू आहे. 7 ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बंदीकाळात चिपळूण-खेड मार्गावरील एसटी सेवाही बंद असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.
जवळ येऊन ठेपलेला पावसाळा आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन घाटात संरक्षण भिंत उभारण्यासाठी 25 एप्रिल ते 25 मे दरम्यान दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत घाटातील वाहतूक बंदचा निर्णय काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱयांनी घेतला होता. त्यानुसार सोमवारपासून वाहतूक बंद ठेवून कामाला गती दिली जात आहे.
या वाहतूक बंदीचा फटका स्थानिक पातळीबरोबरच दक्षिण रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्यालाही बसणार आहे. त्यामुळेच काम सुरु करण्यापूर्वी या घाट परिसरासह चिपळूण ते आंबा घाट आणि खेड ते पनवेल या मार्गावर वाहतूक बंदीचे माहिती फलक लावण्यात आले आहेत. अवजड वाहने कुंभार्ली घाट मार्गे तर हलकी वाहने चिपळूण, कळंबस्ते, आंबडस, चिरणी, लोटे मार्गे सोडली जात आहेत. महामार्गावर कामथे महाडिकवाडी, कापसाळ, बहादूरशेखनाका, कळंबस्ते फाटा, कळंबस्ते रेल्वे क्रॉसिंग, फरशी तिठा, सवतसडा येथे सुमारे 30 पोलीस तैनात असून वाहनांना माहिती दिली जात आहे.
दिवसातील 6 तासात जास्तीत जास्त काम होण्यासाठी ईगल इन्फ्रा कंपनी आणि कल्याण टोलवेज कंपनीने 75 हून अधिक डंपर, 26 पोकलॅन, जेसीबी, डोझर आदी मोठी यंत्रसामुग्री तैनात केली आहे. वाहतूक बंद असल्याने यंत्रणेलाही कामासाठी पूर्ण मोकळीक मिळाली आहे.
सोमवारी सकाळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, महामार्गचे प्रभारी कार्यकारी अभियंता पी. व्ही. निगडे, शाखा अभियंता रॉजर मराठे, ईगल इन्फ्राचे जनसंपर्क अधिकारी जयंतीलाल नानेचा यांच्यासह अधिकाऱयांनी घाटाची पहाणी करत आवश्यक सूचना केल्या.
गणपतीपुळे बस सहा तास स्थानकात
येथील आगारातून खेडमध्ये जाऊन-येऊन 24 फेऱया आहेत. त्याचबरोबर अन्य गावे तसेच मुंबईकडे जाणाऱया दुपार सत्रातील सर्व फेऱया या सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. महिनाभर या फेऱया बंद राहणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. परशुराम ग्रामस्थांपुढे मोठीच समस्या निर्माण झाली आहे. सोमवारी या गावात जाणारे ग्रामस्थ पेढे येथून चालत डोंगर चढून गावात गेले. गणपतीपुळे-दापोली बस येथील बसस्थानकात सकाळी 11 वाजता आल्यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यत स्थानकातच अडकून पडली होती. त्यातील प्रवासी वाट पाहून निघून गेले.









