दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? : काकती सर्व्हिस रोडची दुर्दशा : जीव मुठीत ठेऊन महामार्ग ओलांडावा लागतो
वार्ताहर / काकती
होनगा, भुतरामहट्टी येथून बेळगावला मार्गक्रमण करणाऱया परिवहन मंडळाच्या बसगाडय़ा काकती पोलीस स्टेशनजवळील पुणे-बेंगळूर महामार्गावर थांबत आहेत. या ठिकाणी प्रवासी, विद्यार्थीवर्ग बसमध्ये चढ-उतार करीत आहेत. यापूर्वीही येथे लहान-मोठय़ा दुर्घटना घडल्या आहेत. तरीही प्रवासीवर्गाच्या जीवाचे काही देणे-घेणे नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. पुन्हा दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
काकतीत गेल्या 19 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण केल्यापासून सर्व्हिस रोडची दैनावस्था निर्माण झाली आहे. सर्व्हिस रोडने परिवहन मंडळाच्या बसचे मार्गक्रमण असावे, असे निवेदनाद्वारे गाऱहाणे परिवहन मंडळाच्या विभागीय नियंत्रण अधिकाऱयांकडे ग्रामस्थांनी मांडले होते. त्याची अंमलबजावणी काही दिवसांपुरताच होते. ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’ याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरून बस धावत आहेत.
बेळगावहून येताना गावात लागणारे पहिले प्रवेशद्वार भावकाई गल्ली असून येथील महामार्गावर व त्याच्या पलीकडील पोलीस स्थानकासमोरील महामार्गावर बसगाडय़ा थांबतात. बसगाडय़ा थांबताच महामार्ग ओलांडून जाण्याची धावपळ होते. या रहदारीत जीव मुठीत ठेऊन कसरत करावी लागते. परिणामी या ठिकाणी लहान-मोठे अपघात घडले आहेत. या धावपळीत एक-दोघांना जीवही गमवावा लागला आहे.
काकतीत अद्यापही कुठेच बसस्थानक बांधण्यात आले नाही. त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील लोकप्रतिनिधी आपल्या राजकारणात मश्गुल असतात. अधिकारी आपल्या कामात असतात. यामुळे ही समस्या वर्षानुवर्षे रेंगाळत आहे. तरीदेखील बसगाडय़ांचे मार्गक्रमण सर्व्हिस रस्त्याने चालू ठेवावे, अशी मागणी होत आहे.









