गोवा सीमेवरील चित्र : केवळ बाहेरच्या वाहनातील प्रवाशांची रॅपिड टेस्ट
इतर वाहनधारकांना प्रवेशास दिली मुभा
प्रतिनिधी / बांदा:
कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता बुधवारी सकाळपासून महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे महसूल, पोलीस प्रशासनाकडून तपासणी नाका उभारण्यात आला. गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवेश करणाऱया सर्वांचे थर्मल क्रिनिंग करण्यात येत आहे. यातील संशयास्पद वाटणाऱया व्यक्तीची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. मात्र, केवळ बाहेरील प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून महामार्ग वगळता गोव्यातून महाराष्ट्रात येणारे अन्य सगळे मार्ग मोकळे ठेवण्यात आले आहेत. तर त्या ठिकाणी सरसकट वाहनांची तपासणी न करता जास्तीत जास्त वाहनधारकांना प्रवेशास मुभा दिली जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने ज्यासाठी निर्णय घेतला तो मूळ हेतू कुठेतरी बाजूला ठेवल्याचे दिसत आहे.
राज्य सरकारने गोव्यासह इतर सहा राज्ये प्रवासासाठी संवेदनशील जाहीर केली आहेत. त्यामुळे गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवेश करणाऱयांची सकाळी नऊ वाजल्यापासून तपासणी सुरू करण्यात आली. राज्याच्या सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे टोल नाक्यानजीक तपासणी नाका उभारण्यात आला. त्या ठिकाणी चार शिक्षक, एक पोलीस, दोन होमगार्ड व आरोग्य विभागाचा एक कर्मचारी तैनात असून प्रत्येकाची चौकशी करून व थर्मल क्रिनिंग करूनच प्रवेश देण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात 300 हून अधिक जणांचे क्रिनिंग करण्यात आले. ताप, सर्दीची लक्षणे आढळल्यास नजीकच्या बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजेन रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. मात्र, दिवसभरात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही.
नेमकी कशासाठी टेस्ट?
गोव्यातून येणाऱया महामार्गावर बांदा येथे तपासणी नाका उभारण्यात आला तरी गोव्यातून सिंधुदुर्गात येणारे बाकीचे सगळे मार्ग खुले ठेवण्यात आल्याने तपासणी नाक्याची अंमलबजावणी नेमकी कशासाठी आहे? नेमका मूळ हेतू कुठे तरी बाजूला आणि नियोजन बाजूला असे चित्र दिसत आहे. त्यातच तपासणी नाक्यावर केवळ गोव्यातून येणाऱया काहींची तपासणी केली जात असल्याचे दिसत आहे. त्याचमुळे तपासणी करणाऱयांचा आकडा 300 एवढाच आहे. लोकल वाहनधारक व गोव्यात दररोज ये-जा करणारे डंपरही त्यातून वगळण्यात आले. सिंधुदुर्ग जिह्यातून विशेषत: सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील 14 हजार तरुण-तरुणी नोकरीसाठी दररोज गोव्यात ये-जा करतात. या नोकरदारांना आडकाठी न करता त्यांची तापमान व ऑक्सिजन पातळीची तपासणी करण्यात येत आहे. पंधरा दिवसातून एकदा अँटिजेन टेस्ट केल्यानंतर त्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.









