अनेक व्यापाऱयांवर कारवाई, मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त
प्रतिनिधी / पणजी
पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी गुरुवारी पणजी मार्केट प्रकल्पात भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी विविध व्यापारी पालिका आदेश झुगारून बेकायदेशीर कृत्ये करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असतानाही अनेक व्यापारी सर्रास ग्राहकांना प्लास्टिकमध्ये भरूनच सामान देत असल्याचे दिसून आले. अशा अनेक व्यापाऱयांकडून शेकडोच्या संख्येने पिशव्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईवेळी काही अपवादात्मक व्यापारीच सामान बांधून देण्यासाठी कागदाचा वापर करतात व बाकी सर्वजण प्लास्टिक पिशव्यातूनच सामान देतात असे दिसून आले.
हल्लीच मनपाने केलेल्या कारवाईत अनेक व्यापाऱयांची बेकायदेशीर अतिक्रमणे मोडून टाकली होती. त्यामुळे मार्केटला एक वेगळे रूप प्राप्त झाले होते. बऱयाच प्रमाणात तेथे व्यवस्थितपणा आला होता. मात्र नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीच्या काळात कुणाचेही लक्ष नसल्याचा फायदा घेत अनेक व्यापाऱयांनी पुन्हा अतिक्रमणे केली होती.
अशी अनेक अतिक्रमणे महापौर आणि संबंधित अधिकाऱयांच्या निदर्शनास आली. त्यावेळी सर्व संबंधितांना आदेश देताना अतिक्रमणे हटविण्यास सांगितले. अन्यथा कारवाईचा इशाराही देण्यात आला. महापौरांच्या या अचानक भेटीमुळे बेकायदेशीरपणा करणाऱया व्यापाऱयांची दाणादाण उडाली. महापौर आपल्या दुकानापर्यंत पोहोचण्यापूर्वीच अतिक्रमणे हटविण्याचेही अनेकांनी प्रयत्न केले. काहीजण आपल्याजवळील प्लास्टिक पिशव्या लपविण्याच्या प्रयत्नात असतानाही सापडले व नंतर त्या जप्त करण्यात आल्या. ’सामान कसे बांधून देतात?’, असा दटावणीचा सवाल अधिकाऱयांनी करताच अनेकांनी सामानाखाली लपवून ठेवलेल्या प्लास्टिक पिशव्या काढून त्यांच्या हवाली केल्या.
या भेटीवेळी महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासमवेत उपमहापौर वसंत आगशीकर, आयुक्त संजीत रॉड्रिगीश, बाजार समिती अध्यक्ष प्रमय माईणकर यांच्यासह अन्य अधिकारी, निरीक्षक यांची उपस्थिती होती.









