स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी
प्रतिनिधी / वाकरे
महापोर्टल स्पर्धा परीक्षा घोटाळा आणि गैरप्रकार करून ज्यांनी नोकरी मिळवली अशा विद्यार्थ्यांची चौकशी करून त्यांना महाविकास आघाडी सरकारने नोकरीतून बडतर्फ करावे आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.तसेच महापोर्टल बंद झाल्याने सरळसेवा भरती बोर्ड स्थापन करावे अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती माहिती अशी की २०१४ पासून महाराष्ट्र राज्यात भाजपचे सरकार असताना फक्त महाभरतीचे आश्र्वासन दिलं होते, पण प्रत्यक्षात महाभरती झालीच नाही. पण जेवढी भरती प्रक्रिया झाली, त्यामध्ये महापरीक्षा पोर्टल मार्फत ज्या परीक्षा होत होत्या, तेथे गैरप्रकार आढळल्याने वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सरकारला विनंती करून महापरीक्षा पोर्टल बंद करून पूर्वी प्रमाणे लेखी परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली होती, परंतु त्या सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने महापरीक्षा पोर्टल बंद करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला. पण महापरीक्षा पोर्टलमार्फत जेवढ्या परीक्षा घेण्यात आल्या, त्या परीक्षेचे घोटाळे उघडकीस आणून सरकारने गैरप्रकार करून ज्यांनी नोकरी मिळवली त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिली आहे, त्यांना त्याचा फायदा करून द्यावा. त्यांची नवीन परीक्षा घेण्यात यावी किंवा जे विद्यार्थी महापरीक्षा घोटाळ्यात नव्हते त्यांची नवीन गुणवत्ता यादी जाहीर करण्यात यावी. अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात होत आहे.
महापरीक्षा पोर्टल मार्फत आतापर्यंत फायनान्स डिपार्टमेंट- अकौंट आणि ऑडीट क्लार्क २०१८, महसूल विभाग- तलाठी २०१९, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे- ज्युनिअर क्लार्क २०२०, फूड आणि सिव्हिल विभाग – पुरवठा निरीक्षक-२०१८, राज्य माहिती विभाग- सहायक अधिकारी-२०१८, नगरपालिका संचालनालय, ऑडिटर आणि अकौंटस,वर्ग सी-२०१८ यासह इतर अनेक परीक्षा विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत.वरील संबंधित परीक्षांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
सध्या बोर्डच अस्तित्वात नाही
महाविकास आघाडी सरकारने महापोर्टल बंद केल्याने गेले तीन महिने वर्ग २,३ साठी कोणतेही सरळसेवा भरती बोर्ड अस्तित्वात नाही,त्यामुळे पोलीस, तलाठी यासारख्या पदांची भरती प्रक्रिया ठप्प आहे
.
गेली अनेक वर्षे अभ्यास पण यश नाही
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सुजित आनंदा पाटील (रा.चिंचवडे तर्फ कळे) या विद्यार्थ्यांने आपण २०१६ पासून स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करत असूनही वेगवेगळ्या घोटाळ्यामुळे आपल्याला अजूनही यश आले नसल्याचे सांगितले. आमच्या वेदना शासनापर्यत पोहोचवाव्या अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली








