कृष्णात चौगले / कोल्हापूर
जिल्ह्यात 19 ते 24 जुलैदरम्यान झालेली अतिवृष्टी आणि महापूराचा पिकांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार 58 हजार 261 हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेली असून 665 कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांच्या पथकाकडून बाधित पिकांचे पंचनामे सुरु आहेत. ज्या परिसरातील पूर ओसरला आहे, तेथील पंचनामे सध्या सुरु आहेत. येत्या पंधरा दिवसांत पंचनामा पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल तालुका पातळीवरून जिल्हाधिकाऱयांकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर तो शासनाकडे पाठवला जाणार आहे.
सन 2019 मध्ये महापूर ओसरण्यासाठी तब्बल 15 दिवस लागले. पण यावर्षीचा महापूर चार ते पाच दिवसांतच ओसरत चालला आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागाची यंत्रणेकडून पूर ओसरलेल्या बाधित पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत. यावर्षीच्या महापूराने आजतागायतच्या महापूरांच्या सर्व रेषा ओलांडल्या. 2019 पेक्षा तब्बल 3 ते 4 फुटांनी पूरपातळी वाढल्यामुळे नदीकाठापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत पूराचे पाणी पसरले होते. परिणामी ऊस, भात, सोयाबिन, भुईमूग, पालेभाज्यांसह अन्य पिके पाण्याखाली गेल्यामुळे कुजली असून बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱयांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 252 कोटींचे नुकसान
जिल्ह्यातील 40 हजार 130 हेक्टरमधील बागायत पिके पूरबाधित झाली असून 541 कोटी 30 लाखांचे नुकसान झाले आहे. तर 18 हजार 118 हेक्टरमधील जिरायत पिकांना महापूराचा फटका बसला आहे. यामध्ये 123 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बागायत आणि जिरायत अशा एकूण बाधित क्षेत्रामध्ये शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 20 हजार 221 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. तेथे 252 कोटींचे नुकसान झाले आहे. करवीरमध्ये 7 हजार 91 हेक्टरमधील पिकांना फटका बसल्यामुळे 8 कोटी 93 लाखांचे नुकसान झाले आहे. कागलमधील 4 हजार 189 हेक्टरमधील पिके पूरबाधित झाल्याने 4 कोटी 67 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. राधानगरीमधील 973 हेक्टरमधील पिके बाधित झाल्याने 1 कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या गगनबावडा तालुक्यात 1 हजार 674 हेक्टरमधील पिकांना अतिवृष्टी व महापूराचा फटका बसल्यामुळे 1 कोटी 92 लाखांचे नुकसान झाले आहे. पन्हाळातील 5 हजार 826 हेक्टरमधील पिके पूरबाधित झाली असून 6 कोटी 663 कोटींचे नुकसान झाले आहे. शाहूवाडीमधील 5 हजार 392 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने 6 कोटी 6 लाखांचे नुकसान झाले आहे. हातकणंगलेमधील 7 हजार 11 हेक्टरमधील पिकांना महापूराचा फटका बसल्याने 6 कोटी 37 लाखांचे नुकसान झाले आहे. गडहिंग्लजमधील 1 हजार 537 हेक्टरमधील क्षेत्र बाधित झाल्याने 1 कोटी 63 लाखांचा फटका बसला आहे. आजरा तालुक्यातील 595 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याने 52 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भुदरगडमध्ये 1 हजार 52 हेक्टरमधील पिके बाधित झाल्यामुळे 92 लाखांचे नुकसान झाले आहे. तर चंदगड तालुक्यातील 2 हजार 700 हेक्टरमधील पिकांना फटका बसल्यामुळे 2 कोटी 64 लाखांचे नुकसान झाले आहे.
पंधरा दिवसांत पंचनामे होणार पूर्ण
कृषी विभागाच्या नजर अंदाजानुसार जिह्यात 58 हजार 261 हेक्टरमधील पिकांना महापूराचा फटका बसला आहे. 2019 मधील महापूराच्या तुलनेत यावर्षीचा महापूर लवकर ओसरत आहे. त्यामुळे पूर ओसरलेल्या क्षेत्रातील पिकांचे पंचनामे सुरु झाले आहेत. तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱयांच्या मागदर्शनाखाली तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांकडून पंचनामे सुरु केले असून पंधरा दिवसांत पूर्ण होतील. त्याचा अहवाल तालुका पातळीवरून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱयांकडे प्राप्त झाल्यानंतर तो एकत्रितरित्या शासनाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून नुकसान भरपाईचा निर्णय होईल.
ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर