प्रतिनिधी / शिरोळ
जुलै महिन्यात आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी आज, मंगळवारी केंद्रीय पथकाने केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेती व पिकाचे झालेले नुकसान यासंदर्भात केंद्रीय पथकाच्या सदस्यांना सांगून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली. तर केंद्रीय पथक तब्बल अडीच महिने उशिरा नुकसानीची पाहणी करीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.
उशिरा पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकास गुच्छ व अलाम घड्याळ भेट देण्यासाठी शेतकरी संघटनेचे सागर शंभू शेटे पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आले असता पोलिसांनी अटकाव करून त्यांना मज्जाव केला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
शिरोळ येथील जुना कुरुंदवाड रस्त्यावरील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी केली. उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगताना गेल्या तीन वर्षापासून आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे संपूर्ण पिकाचे नुकसान होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी आणि महापुरामुळे पिकांची नुकसान होणे यासाठी ठोस निर्णय घेऊन धोरण ठरवावे अशी उपस्थित शेतकऱ्यांनी मागणी केली.
केंद्रीय पथकाचे श्रीरविनाश कुमार, महेंद्र सहारे, पूजा जैन, देवेंद्र चापेकर यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावर, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे- धुमाळ, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरी गिड्डे, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, गट विकास अधिकारी शंकर कवितके, मुख्याधिकारी तैमूर मुलानी, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान केंद्र शासनाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचे होते. मात्र महापूर येऊन तीन महिने झाले आत्ता नुकसानीची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथकास पाठवले हे मोदी सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे.