भारताचे प्रथम सेनाप्रमुख (तिन्ही सेनादलांचे प्रमुख) जनरल बिपीन लक्ष्मणसिंग रावत यांचा तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे भारताने एक महान सेनानायक गमावला असून सर्व भारतीयांसाठी क्लेषदायक अशीच ही घटना आहे. 1978 मध्ये त्यांनी आपल्या सेनाकार्यकाळाला, आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून प्रारंभ केला आणि सेकंड लेफ्टनंट ते तिन्ही सेनांचे प्रमुख अशी भारतीय सेनेतील सर्व पदे भूषविली. प्रत्येक पदावर त्यांची कामगिरी अजोड राहिली. चीन आणि पाकिस्तान या आपल्या उपद्रवकारी शेजारी देशांच्या आव्हानांना त्यांनी निधडय़ा छातीने सदैव मागे परतवले. त्यांच्या मृत्यूच्या या दुखःद पार्श्वभूमीवर या महान सेनाधिकाऱयाचा हा परिचय आणि त्याच्या कार्यकाळातील महत्वाच्या घडामोडी आणि कार्ये यांचा हा आढावा…
चटका लावणारा मृत्यू
भारताचे प्रथम सेनाप्रमुख जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि त्यांच्यासह भारतीय सेनेचे अनेक अधिकारी यांच्या हेलिकॉप्टर अपघातात झालेला मृत्यू ही सर्वच भारतीयांसाठी चटका लावणारी दुर्घटना आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातून ती कशी आणि का घडली यासंबंधीचे सत्य उघड होईलच. पण या दुर्घटनेने भारतीय सेनेची झालेली अपरिमित हानी लवकर भरुन निघणार नाही. 2017 मध्ये त्यांनी भारताच्या भूनेनेच्या प्रमुखपदाचे उत्तरदायित्व शिरावर घेतल्यानंतर त्यांना अनेक आव्हानांशी दोन हात करावे लागले होते. त्यांमध्ये पाकपुरस्कृत दहशतवाद आणि ईशान्येकडील फुटीरतावाद, तसेच चीनचा आक्रमक विस्तारवाद ही प्रमुख आव्हाने होती.
याशिवाय, भारतीय सेनेचे बरीच वर्षे रखडलेले आधुनिकीकरण हा त्यांच्यासमोरचा महत्वाचा प्रश्नही होता. भारतीय सेनेच्या आधुनिकीकरणाचा प्रश्न गेली दोन दशके केवळ चर्चिला जात होता. पण कोणीही त्यासाठी निश्चित योजना आखण्याचे आणि ती क्रियान्वित करण्याचे कष्ट फारशा गंभीरपणे उठविले नाहीत. कारगिल युद्धानंतर ही आधुनिकीरणाची प्रक्रिया गतीमान होणे आवश्यक होते. तथापि, त्यानंतरही फारसे लक्ष देण्यात आले नव्हते. पण रावत यांनी त्यांच्या भूसेनाप्रमुख आणि नंतर तिन्ही सेनादलांचे प्रमुख अशा कार्यकाळांमध्ये यासंबंधी प्रत्यक्ष प्रयत्न केल्याचे आणि ते प्रयत्न काही प्रमाणात फलद्रूत झाल्याचे दिसते. शस्त्रास्त्रांच्या आयातीवरचे भारताचे अवलंबित्व कमी करुन शक्य तितकी आत्याधुनिक शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक संपर्क साधने भारतातच निर्माण करण्याचे धोरण सध्याच्या केंद्र सरकारचे आहे. अशा धोरणांना सेनाधिकाऱयांचा जो पाठिंबा आवश्यक असतो, तो देण्यात रावत यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही, हे त्यांच्या कार्यकाळाचे महत्वाचे वैशिष्टय़ असल्याचे दिसून येते. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही कुरापतखोर देशांना, तशी परिस्थिती उद्भवल्यास एकाच वेळी तोंड देणे शक्य होईल, इतकी भारताची सज्जता हवी याचा स्पष्ट उच्चार त्यांनी केला होता आणि त्या दृष्टीने पावले टाकण्यासही प्रारंभ केला होता.
तंत्रज्ञानाचा ध्यास
तिन्ही सेनादलांमध्ये उत्कृष्ट समन्वय रहावा यासाठी भारताने प्रथमच ‘सेनाप्रमुख’ (तिन्ही सेनादलांचे प्रमुख किंवा सीडीएस) हे पद निर्माण केले आहे. या पदाचे प्रथम अधिकारी या नात्याने रावत यांनी उल्लेखनीय कार्य केले. आधुनिक युद्धांमध्ये पारंपरिक शस्त्रांस्त्राप्रमाणेच इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाला असलेले महत्व त्यांनी पुरतेपणी ओळखले होते तसेच ते सामर्थ्य कमाविण्याच्या दृष्टीने त्यांनी सरकारला साहाय्यही केले होते. एकंदरच सेनादलांच्या आधुनिक आवश्यकता जाणणारे ते सेनाधिकारी होते. आणखी दोन वर्षे त्यांचा कार्यकाळ होता. त्याआधीच काळाने त्यांना हिरावून नेले. त्यांना श्रद्धांजली देतानाच त्यांच्या कार्याची माहिती देण्याचा हा प्रयत्न…
दोन वर्षांपूर्वी सर्वोच पदावर
2019 मध्ये जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती भारताचे सेना प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ किंवा सीडीएस) या पदावर करण्यात आली होती. हे पद भूषविणारे ते प्रथम सेनाधिकारी होते. भूसेना, वायुसेना आणि नौसेना या तिन्ही दलांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविण्यात आले होते. तसेच भारतीय सेनेच्या आधुनिकीकरणाचे उत्तरदायित्वही त्यांच्यावर होते.
भूसेना प्रमुखपदी नियुक्ती
डिसेंबर 1978 मध्ये आपल्या सेना कार्यकाळाचा प्रारंभ केलेल्या बिपीन रावत यांची नियुक्ती भारताचे भूसेनाप्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) म्हणून 31 डिसेंबर 2016 या दिवशी करण्यात आली होती. त्यांना यावेळी पूर्व विभाग, चीनबरोबर असलेली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, तसेच ईशान्य भारतीय सींमांवर काम करण्याचा अनुभव होता.
दहशतवाद्यांचे कर्दनकाळ…
पाकिस्तानमधून भारतात होणाऱया दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे उत्तरदायित्व रावत यांनी उत्तमरित्या पार पाडली होते. पाकव्याप्त काश्मीरात घुसून पाक दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे त्यांचे तंत्र दहशतवाद्यांना धडकी भरविणारे होते. पाक पुरस्कृत दहशतवादाला चिरडतानाच ईशान्य भारतातील नक्षली दहशतवाद आणि फुटीर गटांवरही त्यांचा वचक होता.
चीनची डोकेदुखी होते रावत
जनरल बिपिन रावत यांनी चीनच्या दबावतंत्रासमोर न झुकता त्याला त्याच्याच औषधाची चव अनेकदा दाखविली होती. दोन वर्षापूर्वी लडाख येथे चीनकडून करण्यात आलेला घुसखोरीचा प्रयत्न हिमतीने हाणून पाडण्यात त्यांचे प्रोत्साहन कारणीभूत ठरले होते. चीनकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रs आहेत हे खरे असले तरी भारतही त्यात मागे नाही असे स्पष्ट विधान त्यांनी केल्याने चीनचा जळफळाट झाला होता. रावत यांची विधाने तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरतील, अशी धमकीही चीनने दिली होती.
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र
चीनप्रमाणेच रावत यांनी पाकिस्तानलाही अनेकदा खडे बोल सुनावले होते. आपला एक शेजारी दुष्ट आहे, या त्यांच्या विधानामुळे बरीच खळबळही माजली होती. तसेच यावर भारतात राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. दहशतवादी संघटना कित्येकदा शेजारी देशाच्या प्रशासनाच्या नियंत्रणात राहात नाहीत, हे वास्तव ओळखून भारताने त्यादृष्टीने स्वतःच्या संरक्षणाची सज्जता करावयास हवी, असेही विधान त्यांनी केले होते. चीन आणि पाकिस्तान यांना एकाचवेळी तोंड देण्यास भारत सज्ज असल्याचे आत्मविश्वासपूर्ण उद्गारही त्यांनी काढले होते.
एमआय अनेक देशांमध्ये
या हेलिकॉप्टरचा उपयोग वाहतूक आणि संरक्षणासाठी भारतासह रशिया, इराण व इतर अनेक देशांमध्ये केला जातो. अमेरिकेच्या सैन्यानेही या हेलिकॉप्टरचा उपयोग केला आहे. अफगाणिस्तान आणि इराणमध्ये दहशतवाद विरोधी कारवाईसाठी ते उपयोगात आणण्यात आले आहे.
सेनेच्या अत्याधुनिकीकरणासाठी प्रयत्न
- तिन्ही सेनादलांचे प्रमुख (सीडीएस) या नात्याने भारतीय सेनादलांच्या आधुनिकीकरणामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याबद्दलच्या दोन महत्त्वपूर्ण योजना त्यांनी भारत सरकारला सादर केल्या होत्या. या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रालाही शस्त्रनिर्मितीमध्ये सामावून घेण्याचे महत्त्वपूर्ण धोरण आखण्यात आले.
- भारतातील खासगी कंपन्यांना विदेशी शस्त्रनिर्मिती कंपन्यांशी करारबद्ध करून भारतात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, पाणबुडय़ा आणि रणगाडे यांची निर्मिती करण्याची भारत सरकारची योजना रावत यांनी केलेल्या सूचनांवरूनच आहे.
- भारतीय सेनेसाठी अत्याधुनिक सर्व्हेलन्स सिस्टीम (देखरेख यंत्रणा) निर्माण करणे ही त्यांची प्राथमिकता होती. आधुनिक युद्धशास्त्रात संगणकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे भारताची सायबर क्षमता कोणत्याही अत्याधुनिक देशाप्रमाणे असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आणि प्रयत्न होता.
- तिन्ही सेनादलांचे प्रमुख या नात्याने त्यांच्या अवघ्या दोन वर्षाच्या कालखंडात भारतीय सेनेकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रखरेदी करण्यात आली होती. तसेच भारत निर्मित शस्त्रांचे प्रमाणही सेनादलांमध्ये वाढविण्यात त्यांचा पुढाकार होता.
सर्जिकल स्ट्राईकचे सहाय्यक
29 सप्टेंबर 2016 या दिवशी भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळांवर अचानक हल्ले चढविले होते. हे हल्ले सर्जिकल स्ट्राईक म्हणून ओळखले जातात. पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळावर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूड म्हणून हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. पाकिस्तानच्या विविध दहशतवादी गटांचे 60 हून अधिक दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले होते. काही पाकिस्तानी सैनिकांनाही कंठस्नान घालण्यात आले होते. याच्या योजनेत त्यांचे मोलाचे साहाय्य होते. तसेच वायुदलाचा बालाकोट हल्ल्यात त्यांचे साहाय्य होते. म्यानमार देशात जाऊन फुटीर गटांना नेस्तनाबूत करण्याची योजना त्यांचीच होती.
स्वदेशीचे प्रेमी
भारतीय सेनेचे विदेशी शस्त्रांवरचे अवलंबित्व संपले पाहिजे, किमान पक्षी मोठय़ा प्रमाणात कमी झाले पाहिजे. हे बिपिन रावत यांचे ध्येय होते. यासाठी त्यांनी भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि स्वदेशी शस्त्रनिर्मितीच्या कार्यक्रमांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यांच्या पाठिंब्यामुळे भारत सरकारने अनेक आयात शस्त्रास्त्रांचे भारतीय पर्याय निर्माण करण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत.
तिन्ही सेना दलांमधील ताळमेळ
भूसेना, वायुसेना आणि नौसेना या भारतीय सेनादलांमध्ये परस्पर समन्वय आणि ताळमेळ सुधारण्यासाठी त्यांनी अनेक योजनांवर कार्य केले. इंटिग्रेटेड सिंगल थिएटर प्रोजेक्ट हा या संबंधातील महत्त्वाचा प्रकल्प त्यांनी क्रियान्वित केला. अद्यापही या प्रकल्पावर कार्य सुरू आहे. याच योजनेचा भाग म्हणून 1 नोव्हेंबर 2021 या दिवशी रावत यांच्या अध्यक्षतेत तिन्ही सेनाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिन्ही सेनादले हातात हात घालून सज्ज ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
पित्याची किर्ती वाढविली….
- बिपिन लक्ष्मणसिंग रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 या दिवशी उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्हय़ात झाला. ते चौहान रजपूत घराण्यातील होते.
- रावत ही एक सेना उपाधी असून त्यांचे पूर्वजही सैनिक असल्याने त्यांच्या घराण्याचे हेच आडनाव नंतरच्या काळात बनले. ही उपाधी दोन शतकांपूर्वी गढवालच्या शासकांनी त्यांच्या घराण्याला दिली होती.
- रावत यांचे शिक्षण कॅम्बरीन हॉल स्कूल या सिमला येथील शाळेत झाले. सैनिकी शिक्षण त्यांनी एडवर्ड स्कूल आणि भारतीय सैन्य अकॅडमीतून डेहराडून येथे घेतले. सामरिक बुद्धीमत्तेचा परिचय त्यांनी बालपणापासूनच दिला.
- सैनिकी शिक्षण काळात त्यांना सोर्ड ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळाला होता. अमेरिकेतील फोर्ट लिवनवर्थ येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. ते हायर कमांड कोर्समध्ये पदवीधर होते.
- मद्रास विद्यापीठातून त्यांनी संरक्षण विषयात एमफील केले. व्यवस्थापन क्षेत्रातील डिप्लोमा आणि कॉम्प्युटर प्रशिक्षणही प्राप्त केले. 2011 मध्ये त्यांना सैन्य-मिडिया सामरिक अध्ययन या विषयात संशोधन केल्याबद्दल मेरठ येथील चौधरी चरणसिंग विद्यापीठातून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हा सन्मान देण्यात आला.
- त्यांचे पिता लक्ष्मणसिंग रावत यांनीही भारतीय सेनेत अधिकारी म्हणून सेवा केली आहे. आपल्या पित्याच्याच तुकडीत रावत यांनीही आपल्या सेना सेवेचा श्रीगणेशा केला. गोरखा रायफलच्या पाचव्या बटालियनमध्ये 1978 पासून त्यांनी आपल्या सेनाकार्यकाळाला प्रारंभ केला होता.
शस्त्रसंभार
एमआय-17व्ही5 या प्रकारच्या हेलिकॉप्टर्सवर स्टर्म व्ही या प्रकारची क्षेपणास्त्रs, एस-8 रॉकेट्स, 23 एमएम मशीनगन, पीटीके मशीनगन आणि एकेएम सबमशीनगन असा अत्याधुनिक शस्त्रसंभार असतो. एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर गोळीबार करण्याची याची क्षमता आहे. एकाचवेळी शत्रूचे सैनिक, शत्रूची चिलखती वाहने, जमिनीवरील शत्रूच्या चौक्मया आणि इतर स्थिर तसेच हलत्या लक्ष्यांवर गोळीबार करून ती निकामी करण्याचे सामर्थ्य या हेलिकॉप्टरमध्ये आहे.
एमआय हेलिकॉप्टरचे चार अपघात
एमआय हेलिकॉप्टर्स भारतीय भूसेना आणि वायुसेनेचे प्रमुख वाहतूक साधन असल्यामुळे त्याचा उपयोग मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे या हेलिकॉप्टर्सना होणाऱया अपघातांचे प्रमाणही मोठे आहेत. आतापर्यंत चार मोठे अपघात झालेले आहेत.
- 25 जून 2013 : उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरानंतर एमआय-17व्ही5 या हेलिकॉप्टर्सना मदतकार्यात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला होता.
- 6 ऑक्टोबर 2017 : अरुणाचल प्रदेशात या हेलिकॉप्टरच्या अपघातात 7 जण मृत्युमुखी पडले होते. खराब हवामानामुळे तो अपघात झाल्याचे निदान करण्यात आले होते.
- 3 एप्रिल 2018 : या हेलिकॉप्टरचे केदारनाथ येथे क्रॅश लँडींग करावे लागले होते. त्यात हेलिकॉप्टरमधील काहींना जखमा झाल्या होत्या.
काय आहे एमआय हेलिकॉप्टर…
- एमआय-17व्ही5 हे हेलिकॉप्टर जगातील सर्वोत्कृष्ट मानले जाते. भारतीय वायुसेनेत याचा समावेश 17 फेब्रुवारी 2012 या दिवशी करण्यात आला. हे सेनेचे वाहतूक हेलिकॉप्टर असून त्याला एमआय-8/17 असे संबोधले जाते.
- याची निर्मिती रशियाच्या कझान हेलिकॉप्टर्स या कंपनीने केली आहे. ते जास्तीत जास्त 13 हजार किलो वजन नेऊ शकते. तसेच त्यातून एकावेळी 36 सैनिक आणि 4 हजार 500 किलो वजनाची शस्त्रास्त्रs नेता येऊ शकतात.
- एमआय17व्ही5 या हेलिकॉप्टरची वाहन यंत्रणा अत्यंत जटील आणि अत्याधुनिक आहे. त्यात केएनईआय-8 श्रेणीतील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा कार्यरत असते. याच्या केबिनमधूनही साधनांची वाहतूक करता येते.
- हे हेलिकॉप्टर केवळ वायुदलासाठीच नव्हे तर भूसेनेसाठीसुद्धा उपयोगात आणले जाऊ शकते. तसेच युद्धभूमीवर सैनिकांना फायरकव्हर देण्यासाठी सैनिकांची वाहतूक करण्यासाठी तसेच सीमेवर देखरेख ठेवण्यासाठी उपयोगात आणले जाते.
- ही हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा करार 2008 मध्ये रोबोरॉन एक्स्पोर्ट या कंपनीच्या मध्यस्थीतून करण्यात आला. अशी 80 हेलिकॉप्टर्स भारतीय वायुदलाकडे असून 2011 ते 2013 या कालावधीत हा करार पूर्ण करण्यात आला.
- या हेलिकॉप्टर्सची दुरुस्ती आणि देखभाल भारतात केली जाते. यासाठी जुलै 2018 मध्ये भारतीय वायुदलाने विशेष कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षात भारतीय तंत्रज्ञ या हेलिकॉप्टर्सची दुरुस्ती रशियाच्या साहाय्याने करतात.
- या हेलिकॉप्टर्सच्या जुन्या आवृत्त्या भारतीय वायुदलात पूर्वीपासून आहेत. सध्या एमआय जातीची 200 हेलिकॉप्टर्स भारतीय वायुदलात कार्यरत असल्याचे सांगितले जाते. हवेतून जमिनीवर गोळीबार करण्यासाठीही ते वापरले जाते.
आँखों देखा हाल…
प्रत्यक्षदर्शी कृष्णस्वामी, मी माझ्या घरी होतो. तेवढय़ात मोठा आवाज ऐकू आला. बाहेर येऊन पाहिले तर एक हेलिकॉप्टर कोसळले. एकामागून एक दोन झाडांना धडकली. त्यानंतर आग लागली. मोठा आवाज ऐकताच मी त्या दिशेने धावलो. प्रथमदर्शनी फक्त आग आणि धूर दिसत होता. ज्वाला माझ्या घराच्या उंचीपेक्षा जास्त होत्या. हेलिकॉप्टरमधून दोन-तीन लोक बाहेर पडतानाही मी पाहिले, त्यांच्या शरीराला आग लागली होती. मी त्या भागात राहणाऱया लोकांना फोन करून मदत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांना माहिती देण्यात आली. हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणापासून त्यांचे घर फक्त 100 मीटर अंतरावर आहे. या परिसरात राहणाऱया कुमार नावाच्या मुलाने पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यासाठी धाव घेतली. झाडांच्या मधोमध पडलेल्या हेलिकॉप्टरमधून दोन-तीन लोक बाहेर पडतानाही दिसले. सगळय़ांच्या अंगाला आग लागली होती, असे कुमारनेही सांगितले.
कारगिल युद्धात एमआय हेलिकॉप्टर्स
1999 मध्ये पाकिस्तानने कारगिल पर्वत शिखरांवर केलेल्या घुसखोरीनंतर तेथून पाक सैनिकांना हटविण्यासाठी एमआय-17 हेलिकॉप्टर्सचा उपयोग करण्यात आला होता. त्यावेळी प्रथमच या हेलिकॉप्टर्सवर रॉकेट लाँचर्स बसविण्यात आले होते. या रॉकेट्सने पर्वत शिखरावर असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना अचूक टिपले होते. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांची अतोनात हानी झाली होती. या हेलिकॉप्टरची पूर्वीची आवृत्ती एमआय-8 मध्ये सुधारणा करून याच्या वजन उचलण्याच्या क्षमतेत वाढ करण्यात आली होती. कारगिल युद्धात या हेलिकॉप्टर्सनी पाकिस्तानी सैनिकांजवळ असणाऱया अमेरिकन बनावटीच्या स्टींगर क्षेपणास्त्रांनाही दाद दिली नाही. स्टींगर क्षेपणास्त्र खांद्यावरून उडविता येते. सलग तीन दिवस या हेलिकॉप्टर्सनी पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानला हताश होऊन माघार घ्यावी लागली होती.
कार्यकाळ असा फुलला…
- 16 डिसेंबर 1978…………… सेकंड लेफ्टनंट
- 16 डिसेंबर 1980…………………. लेफ्टनंट
- 31 जुलै 1984 ……………………… कॅप्टन
- 16 डिसेंबर 1989……………………. मेजर
- 1 जून 1998……………….. लेफ्टनंट कर्नल
- 1 ऑगस्ट 2003………………………. कर्नल
- 1 ऑक्टोबर 2007 ……………… ब्रिगेडियर
- 20 ऑक्टोबर 2011…………. मेजर जनरल
- 1 जून 2014……………… लेफ्टनंट जनरल
- 1 जानेवारी 2017 जनरल (चीफ ऑफ आर्मी स्टाफ)
- 30 डिसेंबर 2019 जनरल (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ)