प्रतिनिधी / बेळगाव
महात्मा फुले मार्केटमधील व्यापारी गाळय़ांचा दुरुपयोग करत आहेत म्हणून महानगरपालिकेने मार्केटचेच प्रवेशव्दार सील केले होते. त्या विरोधात येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन मार्केट खुले करावे, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
महात्मा फुले मार्केटची जागा वक्फ बोर्डाची असल्याचा उतारा मिळाला असून महापालिकेची ही कारवाई पूर्ण चुकीची आहे. गरीब जनता त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. असे असताना बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचे कारण पुढे करुन ही कारवाई करण्यात आली आहे, हे चुकीचे आहे.
या जागेचा वाद न्यायालयात सुरु आहे. तेंव्हा महानगरपालिकेने जी कारवाई केली आहे त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला असून तातडीने प्रवेशव्दार खुले करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ऍड. हर्षवर्धन पाटील, सलीम किल्लीवाले, मारुती बामणे, मल्लव्वा कोळी, मैनुद्दीन तंबोळी, इम्तियाच संगोळ्ळी, अमिरखान पठाण, समीर बागवान यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.









