प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र व राज्य सरकारने महागाई वाढविल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस, भाजीपाला, कडधान्य या सर्वांचे दर गगनाला भिडले असल्याने बुधवारी महिला काँग्रेसच्यावतीने अलारवाड क्रॉसपासून पदयात्रा काढत राज्य सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून माघारी पाठविल्याने पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
राज्य व केंद्र सरकारच्या धोरणामुळेच महागाईमध्ये वाढ होत आहे. घरगुती गॅसचा दर हजार रूपयांपर्यंत वाढला असून, महिला पुन्हा एकदा चुलीकडे वळल्या आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असल्याने राज्यातील व देशातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला. अलारवाड क्रॉसपासून हलगा येथील सुवर्ण सौधपर्यंत महिला पदाधिकाऱयांनी भाजीपाला, गॅस सिलिंडर घेऊन निदर्शने केली.
सुवर्णसौध येथे महिला पदाधिकाऱयांनी घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीसांनी त्यांना रोखले. महिला पोलीसांनी कार्यकर्त्यांना माघारी पाठविल्यामुळे काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. काही महिला कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन पुन्हा सुटका केली. राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला काँग्रेसच्या प्रियांका जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.









