विदूषक राजाबरोबर आपल्याला आराम करायला मिळणार म्हणून खुश होता. शिवाय कोणाचेच भय नव्हते. अगदी सुरक्षित ठिकाणी तो राहणार होता. अशा विचारात असताना द्वारपाल प्रवेश करतो आणि निरोप सांगतो की, महाराज विजय संपादनासाठी निघणार असतील तर रथ तयार आहे. तसेच नगराहून आईसाहेबांचा निरोप घेऊन करभक(दूताचे नाव) आलेला आहे.
आईसाहेबांचे नाव ऐकल्यावर आदरपूर्वक राजा त्या दूताला आत आणण्याची आज्ञा देतो. करभक राजाचा जयजयकार करून निरोप सांगतो की, ‘आजपासून चौथ्या दिवशी आमच्या उपवासाचे पारणे आहे. तरी त्यावेळी चिरंजीवांनी अवश्य आमच्याजवळ उपस्थित असावे.’ ते ऐकून राजाची द्विधा मनःस्थिती होते. एकीकडे कर्तव्य तर एकीकडे वडिल माणसांची आज्ञा! दोन्हीही पाळायला हवे, तर त्यावर काही तरी मार्ग काढला पाहिजे असा तो विचार करतो. माढव्याला त्याची चेष्टा करायची लहर येते. तो म्हणतो, ‘त्रिशंकूसारखा लोंबत रहा!’ राजाही तशीच भावना व्यक्त करतो. राजाच्या मनात एक विचार चमकून जातो.
राजा विदूषकाला म्हणतो, ‘मित्रा, माझ्या आईने तुला पुत्र म्हणून मानला आहे. तेव्हा तू इथून परत जा आणि मी तपस्वीकार्यात गुंतलोय म्हणून सांग. तसेच मातोश्रींच्या पुत्राने करायचे कार्य तू पार पाड.’ विदूषक त्याचा धाकटा भाऊ बनून नगराकडे जायला निघतो.
राजाही तपोवनाला त्रास होऊ नये म्हणून आपल्याबरोबरचे सगळे लोक त्याच्याबरोबर पाठवतो. राजाला एकीकडे भीतीही वाटते की, हा बेटा तिकडे अंतःपुरात आपल्या हेतूविषयी वाच्यताही करायचा. तो वरवर त्याला सांगतो की, ऋषींविषयीच्या आदरामुळे मी आश्रमाला जात आहे. खरोखरच तपस्वीकन्येविषयी मला अभिलाषा वगैरे काही नाही! मी जे तुझ्याशी बोललो, ते गंमतीने बोललो….अशी सारवासारव करतो. त्यावर विश्वास ठेवून विदूषकही जायला निघतो. इथेच दुसरा अंक समाप्त
होतो.
तिसऱया अंकाच्या सुरूवातीला हातात दर्भ घेऊन एका याज्ञिकाच्या शिष्याचा प्रवेश होतो. तो कौतुकाने राजाबद्दल बोलत असतो. राजाचे पाऊल आश्रमात पडल्यापासून तिथल्या धर्मकृत्यात कोणतेही विघ्न आले नाही. आता यज्ञकार्यात वेदीवर अंथरण्यासाठी दर्भ याज्ञिकांना देण्यासाठी तो निघतो.








