ऑनलाईन टीम / पुणे :
महा एनजीओ फेडरेशन आणि बीजेपी सोशल कनेक्ट यांच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त पुण्यासह महाराष्ट्रातील विविध शहरांतील 96 सामाजिक संस्थाना आर्थिक मदत देण्यात आली. पुण्यासह नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, परभणी, सोलापूर, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, अहमदनगर, गडचिरोली आदी भागातील संस्थाना ही मदत देण्यात आली आहे.
महा एनजीओ फेडरेशन आणि बीजेपी सोशल कनेक्ट यांच्या वतीने तब्बल 5 लाख रुपयांची मदत करण्यात आली. महाराष्ट्रातील शिक्षण, आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, दिव्यांग -विकलांग, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, आदिवासी विकास या क्षेत्रात काम करणाऱ्या 96 सामाजिक संस्थाना ही मदत करण्यात आली.
फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा म्हणाले, कोरोनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. यामध्ये गरजूंसाठी काम करणा-या सामाजिक संस्थाना आर्थिक निधी मिळत नसल्याने या संस्था अडचणीत आल्या आहेत. अशा संस्थाना या काळात मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त ही आर्थिक मदत करण्यात आली. यापुढेही अशाच प्रकारचे कार्य महा एनजीओ फेडरेशन करणार आहे.








