विचित्र वर्तणुकीला सर्व कर्मचारी कंटाळले : कारवाईसाठी कामबंद आंदोलन ः जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका महसूल उपायुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली होती. यावर पडदा टाकण्यासाठी महसूल उपायुक्तांनी महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी आणि अधीक्षक अभियंत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी आक्रमक झाले असून गुरुवारी कामबंद आंदोलन छेडून महसूल उपायुक्तांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात
आली.
महसूल उपायुक्तांच्या विचित्र वर्तणुकीला महसूल विभागासह सर्व विभागातील कर्मचारी कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी महापालिका आयुक्तांनी अनेकवेळा सूचना करूनही त्याकडे महसूल उपायुक्तांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे वरि÷ अधिकाऱयांकडे तक्रार करण्यात आली होती. महापालिका महसूल उपायुक्त कर्मचाऱयांना मानसिक त्रास देत असून खातेबदलासाठी आलेल्या प्रत्येक फाईलवर सही करण्यासाठी पैशांची मागणी करीत आहेत. रक्कम न दिल्यास लाल शेरा मारून फाईल रखडून ठेवणे, तसेच कर्मचाऱयांबाबत नागरिकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रकार करीत आहेत. महसूल निरीक्षक व महसूल अधिकाऱयांना प्रत्येक फाईल हातात घेऊन सहीकरिता महसूल उपायुक्तांच्या कक्षासमोर थांबावे लागत आहे. तसेच अनावश्यक थांबवून अधिकाऱयांचा मानसिक छळ चालविला असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
याबाबत अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. मात्र महसूल उपायुक्तांनी महापालिका आयुक्त आणि अधीक्षक अभियंत्यांच्या विरोधात प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार करून भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र आपल्या विरोधात झालेल्या तक्रारीवर पडदा टाकण्यासाठी महसूल उपायुक्तांनी हा आरोप केला असून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीकरिता मनपा कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरुवारी कार्यालयाचे कामकाज बंद ठेवून आंदोलन छेडले. यावेळी महापालिका कार्यालयातील सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले
होते.
जिल्हाधिकाऱयांना कार्यालयीन वादाबाबत अहवाल पाठविणार
महसूल उपायुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन महापालिका एससी-एसटी नोकर संघटनेच्यावतीने देण्यात आले. कार्यालयीन वाद असल्याने याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे अहवाल पाठविण्यात येईल. पण कामबंद ठेवल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्मयता असल्याने आंदोलन मागे घेऊन कामकाज सुरू करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी केले. त्यामुळे संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.









