बाघंबरी मठात शोकमय वातावरण – शिष्य-संतांना अश्रू अनावर
प्रयागराज / वृत्तसंस्था
बाघंबरी मठाचे महंत आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांना वैष्णव परंपरेनुसार भूसमाधी देण्यात आली आहे. बुधवारी दुपारी मंत्रोच्चारांच्या जपात आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीत महंतांना लिंबाच्या झाडाजवळ भूमी समाधी देण्यात आली. याप्रसंगी प्रयागराजमध्ये संत आणि आखाडय़ांच्या अनुयायांची मोठी उपस्थिती दिसून आली. याचदरम्यान दुकाने आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दर
नरेंद्र गिरी यांचा मृतदेह बाघंबरी पीठातील त्यांच्या राहत्या खोलीत सोमवारी फासावर लटकलेल्या स्थितीत आढळला होता. त्यानंतर त्यांच्या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. संशयास्पद मृत्यूमुळे समाधी देण्यापूर्वी महंतांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. महंत नरेंद्र गिरी यांना बाघंबरी मठात फुलांचा वर्षाव आणि मंत्रोच्चारात भूमी समाधी देण्यात आली. समाधी देताना ‘नमो नारायण, हर हर महादेव’ आणि ‘महाराज की जय’ अशा मंत्रांचा गजर सुरू होता. गुरूंना समाधी देताना त्यांच्या शिष्यांचे डोळे भरून आले होते. प्रयागराजमध्ये महंतांच्या आत्महत्येबाबत संपूर्ण शहरात वेगवेगळय़ा चर्चा सुरू आहेत. प्रत्येक गल्ली-मोहल्ला आणि चौकात या आत्महत्येचीच चर्चा सुरू होती. महंतांनी आत्महत्येचे पाऊल कसे उचलले? असाच प्रश्न शहरातील प्रत्येकाला पडला आहे.
मृत्यूच्या तपासासाठी एसआयटी
महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येसंदर्भात माध्यमांमध्ये आलेल्या सुसाईड नोटनंतर पोलीस-प्रशासनाने तपास सुरू केला आहे. या घटनेत हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी आनंद गिरी, त्यांचा मुलगा आणि एका सहकाऱयाला अटक करण्यात आली आहे. अटकेतील सर्वांची प्रयागराजच्या पोलीस दलाकडून चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर प्रयागराजच्या डीआयजींनी एसआयटी टीम गठित करून तपासाचे आदेश दिले आहेत.
महंत नरेंद्र गिरी यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडल्यानंतर तपासाला गती मिळाली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी होत असताना, पोलीस विभागाने या प्रकरणी एसआयटीची एक टीम तयार केली आहे. संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश देत अजितसिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तपास होणार आहे. तपास पथकामध्ये दोन सीओसह निरीक्षक आणि उपनिरीक्षक स्तराचे 18 अधिकारी आहेत. प्रयागराज डीआयजी बेस्ट त्रिपाठी यांनी या टीमची स्थापना केली आहे. आता ही संपूर्ण टीम महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करेल आणि त्याचा अहवाल अधिकाऱयांना सादर करेल. त्यानंतरच आरोपींवर आरोप निश्चित केले जातील.









