प्रतिनिधी / मसुरे:
मसुरे कावावाडी येथील हडकर घर ते गिरकर रमाई नदी किनारा संरक्षक धूप प्रतिबंधक बंधारा आणि खाजणवाडी, चांदेर शेती संरक्षक बंधारा बांधून मिळावा, अशा ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी येथे येऊन पाहणी केली. यावेळी या दोन्ही बंधाऱयांसाठी परिपूर्ण प्रस्ताव करण्याच्या सूचना उपस्थित अधिकारी वर्गाला त्यांनी केल्या. बंधारे उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी मसुरे येथे बोलताना दिले.
नदी किनाऱयाचा भाग खचून जात असून काही घरे धोक्याच्या पातळीवर येऊन ठेपली आहेत. यामुळे येथील लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. येथे धूप व प्रतिबंधक बंधारा बांधून मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मसुरे खाजणवाडी चांदेर ते ते तळाणीपर्यंत शेती संरक्षक बंधारा बांधून मिळणेही गरजेचे आहे. या दोन्ही प्रश्नांसाठी माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश गावकर, माजी उपसभापती छोटू ठाकुर यांनी खासदार विनायक राऊत आणि सर्व संबंधित वर्गाकडे वारंवार मागणी केली होती. त्यानुसार खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या दोन्ही प्रश्नांबाबत लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार राऊत यांनी यावेळी दिले.
किनारपट्टीवर लवकरच भूमीगत वीजवाहिनी
यावेळी खासदार राऊत म्हणाले की, तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सर्व किनारपट्टी भागामध्ये भूमिगत वीजवाहिनी जोडणीसाठी राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपयांचा निधी लवकरच मंजूर करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टी वीज प्रश्नांबाबत सुरक्षित बनण्यास मदत होणार आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण उपशहर प्रमुख बाळू नाटेकर, माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मर्डे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश गावकर, माजी उपसभापती छोटू ठाकुर, सदस्य पप्पू मुळीक, माजी सरपंच नंदू परब, पतन विभागाचे अधिकारी अजित लांडगे, प्रमोद मोडक, महेश बागुळ, समाधान जाधव, मेरिटाइम बोर्ड सचिव श्री. गायकवाड, विजय कुमार मनवाणी, दीपक पेटकर, सुहास पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
मसुरे खोत जुवा येथील धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर असून गेले वर्षभर संबंधित ठेकेदाराने काम सुरू न केल्याने उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. येथील काम सक्षम ठेकेदाराकडूनच करून घ्यावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत राऊत यांनी उपस्थित अधिकारीवर्गाला या बंधाऱयाच्या कामाची माहिती घेऊन त्वरित उपाययोजना करावी, असे आदेश दिले.









