कावा हुरास येथे नियमित नेतात चारण्यासाठी : सकाळ-सायंकाळी होते दोन होडय़ांमधून वाहतूक
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
आतापर्यंत आपण होडीतून नियमित प्रवास करताना शालेय विद्यार्थी, ग्रामस्थांना पाहिले आहे. एखाद्या मालाची वाहतूकही होडीतून होते. परंतु मसुरे कावा हुरास येथे चक्क बकऱयांचा (शेळय़ा-मेंढय़ा) कळप रोज होडीतून प्रवास करतो. सुमारे पंचवीस ते तीस बकऱया रोज सकाळी खोत जुवा ते कावा हुरास आणि पुन्हा सायंकाळी कावा हुरास ते खोत जुवा बेट असा नियमित प्रवास करत आहेत. प्रवासी बंदर जेटीवर या बकऱया शिकविल्याप्रमाणे होडीत बसणे व होडीतून नियोजित ठिकाणी उतरणे असा आगळावेगळा दिनक्रम पाहताना कुतूहल वाटते.
फार पूर्वीपासून दळणवळणाचे साधन म्हणजे होडी होय. जिल्हय़ात अनेक ठिकाणी दोन गावांना जोडणाऱया नद्या आजही आहेत. या ठिकाणी पूर्वी होडीतूनच वाहतूक केली जात होती. परंतु कालांतराने या छोटय़ा नदी-नाल्यांवर पूल, साकव बांधले गेले आणि ही प्रमुख जल वाहतूक बंद झाली. आजही काही भागात शालेय मुलेही होडीतूनच शाळेत जातात. ग्रामस्थही शिस्तबद्ध पद्धतीने होडीतून प्रवास करतात. पण हे सर्व झाले मनुष्याबाबत. परंतु, जर प्राणी असा शिस्तबद्ध प्रवास करत असतील, तर मात्र ते आश्चर्यच म्हणावे लागेल.
मसुरे येथून कालावल खाडी वाहते. या खाडीच्या एका किनारी खोत जुवा बेट आहे. या बेटाला चारी बाजूने पाण्याचा वेढा आहे. मसुरे गावची खोत जुवा बेट ही वाडी आहे. येथे सुमारे पंचवीस घरे असून सुमारे शंभर लोकांची वस्ती आहे. या सर्वांची शेती मात्र कालावल खाडीच्या दुसऱया किनारी म्हणजे कावा हुरास या भागामध्ये आहे. या सर्वांना तेथे ये-जा करण्यासाठी होडीचा आधार घ्यावा लागतो. हा सुमारे एक ते दीड किमी असा होडीचा प्रवास आहे. पर्यायाने या भागातील माणसांबरोबर येथील प्राण्यांनाही ही खाडी पार करून कावा हुरास येथे रोज चारण्यासाठी यावे लागते. अशातच येथे असलेल्या सुमारे 25 ते 30 बकऱयांनाही हा प्रवास होडीतून करावा लागतो.
या बकऱयांचे मालक हे सकाळी खोत जुवा येथील नदी किनारी बंदर जेटीच्या ठिकाणी या बकऱयांना आणतात. तेथे गेल्यावर होडीची वाट पाहत या सर्व बकऱया उभ्या असतात. मग त्यांचे ठरलेले दोन नावाडी दोन होडय़ा घेऊन या प्रवासी जेटीच्या ठिकाणी लावतात मग क्रमाने या सर्व बकऱया या दोन होडय़ांमध्ये जाऊन बसतात. सर्व बकऱया होडीमध्ये बसल्या की हे नावाडी या दोन्ही होडय़ा कावा हुरास येथील शेतीच्या ठिकाणी नेतात. आपले उतरण्याचे ठिकाण आले, की या सर्व बकऱया एका मागोमाग एक होडीतून उतरून समोरच असलेल्या आपापल्या मालकांच्या शेतीमध्ये चरण्यासाठी जातात.
पुन्हा सायंकाळी सूर्य अस्तास जायला निघाला, की सर्वत्र चरण्यासाठी विखुरलेल्या या बकऱया बरोबर एक-एक करून कावा हुरास या बंदर जेटीवर दाखल होतात. आपल्याला नेण्यासाठी येणाऱया होडीची त्या वाट पाहत, एकमेकांच्या खोडय़ा काढत मस्तपैकी बंदर जेटीवर एकोप्याने राहतात. या बकऱयांचे मालक आपापल्या बकऱया आल्या, की नाही याची शहानिशा करतात. काळोख पडता-पडता पुन्हा दोन होडय़ा घेऊन नावाडी या बकऱयांना पुन्हा खोत जुवा बेट येथे नेण्यासाठी येतात. आपल्या नेहमीच्या होडय़ा बंदर जेटीवर लागताच टुणटुण उडय़ा मारत हा बकऱयांचा कळप स्वत:हून त्या दोन्ही होडय़ांमध्ये जाऊन बसतो. हे करताना एखाद्या बकरीला त्यांच्या मालकांना ओरडून सांगावे लागत नाही किंवा नदीपात्र खोल असूनही धरून होडीमध्ये बसावे लागत नाही. सर्व बकऱया शिस्तबद्ध बसल्यात, की हे दोन्ही नावाडी पुन्हा या होडय़ा घेऊन कावा हुरास ते खोत जुवा बेट असा प्रवास करून तेथील जेटीवर सोडतात. पुन्हा टुणटुण उडय़ा मारत या सर्व बकऱया सुरक्षितपणे आपापल्या मालकांच्या घरी निघून जातात.
रक्षणासाठी दोन श्वानही होडीत असतात
या बकऱयांच्या होडी प्रवासातही अजून एक वैशिष्टय़ आहे, ते म्हणजे या दोन्ही होडय़ांमध्ये एक-एक कुत्रा सोबत करत असतो. या बकऱया होडीत चढल्या, की हे दोन्ही श्वान या होडीमध्ये शेवटी चढतात आणि अगदी होडीच्या टोकाला बसतात. जणू काही हे या सर्व बकऱयांचे रक्षणकर्ते असल्यासारखेच वागतात. हे दोन्ही श्वान होडीतून उतरतानाही शेवटी उतरतात. या बकऱयांना कोणी हात लावायचीही हिंमत नसते, इतका या श्वानांचा दरारा असतो. मसुरे सारख्या गावांमध्ये आजही होडीतून अशा पद्धतीने बकऱया नेहमी ये-जा करतात हे पाहणे औत्सूक्याचे ठरते. या सर्व बकऱयांची शिस्तबद्धताही मनुष्यासाठी आदर्शवतच म्हणावी लागेल. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा सर्व ऋतूंमध्ये बकऱयांच्या होडीतील नित्य प्रवास पाहायचा असेल, तर मसुरे कावा हुरास खोत जुवा बेटाला एकदा अवश्य भेट द्या.









