प्रतिनिधी / मसुरे:
आपल्या जिल्हय़ात छोटय़ा-छोटय़ा शेतीपूरक उद्योगातून चांगले अर्थाजन करणे शक्य आहे. कुक्कुटपालन या व्यवसायाबाबत तुमच्यातील आत्मविश्वास जागा होऊन कौशल्य मिळावे यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काळात कोरोना विषाणुबरोबर जगायचे असल्याने खिशात चार पैसे येण्यासाठी अशा प्रकारच्या जोडधंदय़ांना प्राधान्य द्या, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मंदार गीते यांनी येथे केले.
मसुरे येथील क्रिएटिव्ह युथ फोरम आणि कृषी विज्ञान केंद्र किर्लोस यांच्या संयुक्त विद्यमाने भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरेच्या सभागृहात परसबागेतील सुधारित कुक्कुटपालन या विषयावर तीन दिवसीय मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. माजी जि. प. अध्यक्ष व फोरमचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिराचा मसुरे पंचक्रोशीतील 72 जणांनी लाभ घेतला. सोशल डिस्टनसिंग पाळत आयोजित तीन दिवसीय मोफत शिबिराचा समारोप नुकताच झाला. शिबिराचे उद्घाटन सरपंच संदीप हडकर यांच्या हस्ते झाले. सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी स्टेट बँक शाखाधिकारी रोहन फोंडके, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, पशु वैधकीय विभागाचे डॉ. केशव देसाई, ग्रा. पं. सदस्य जगदीश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी भानुदास परब, नीळकंठ शिरसाट, समीर सावंत, राजू प्रभुगावकर, अमोल परब आदींनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले.









