2019 मध्ये सावंतवाडीत झाले होते भूमिपूजन : कोरोना काळात प्रकर्षाने जाणवतेय उणिव
विजय देसाई / सावंतवाडी:
सावंतवाडीत 2019 मध्ये भूमिपूजन झालेल्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालय इमारतीची अद्याप एकही वीट लागलेली नाही. जागेच्या वादामुळे हे रुग्णालय कागदावरच आहे. सावंतवाडी कुटिर रुग्णालय परिसरात उभारण्यात येणाऱया रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न भूमिपूजनानंतर पुढे आला. त्यानंतर कुडाळ नेरुर, वेत्ये आणि शहरातच पालिकेने आरक्षित केलेल्या जागेत रुग्णालय उभारण्याचा विचार पुढे आला. त्यातून वादही निर्माण झाले. या वादानंतर नियोजित जागेत रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगून या संदर्भात राजघराण्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.
ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत राजघराण्याशी चर्चा केली. परंतु राजघराण्याने बाजारभावाप्रमाणे दर द्यावा, अशी मागणी केली. त्यानंतर या रुग्णालय उभारणीसाठी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे सध्यातरी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा विषय बासनात गुंडाळल्यागत आहे. सध्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड होताना दिसत आहेत. अशाप्रकारचे रुग्णालय होत असेल तर ते जागेच्या वादाच्या प्रश्नात अडकू नये, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
जागेच्या मुद्यावर रखडले
सिंधुदुर्गात चांगल्या आरोग्य सुविधा नसल्याने त्या मिळण्यासाठी दीपक केसरकर यांनी राज्यमंत्री असताना सावंतवाडीत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय 2019 मध्ये शासनाकडून मंजूर करून त्याचे भूमिपूजन केले. सुमारे 20 कोटी रुपयांच्या या अद्ययावत रुग्णालयाच्या कामाची निविदाही निघाली आहे. या रुग्णालयात शंभरहून अधिक डॉक्टर तसेच कर्मचारी प्रस्तावित आहेत. मात्र, वर्ष झाले तरी भूमिपूजन झालेल्या या रुग्णालयाचे काम सुरू झाले नाही. जागेच्या प्रश्नावरून या रुग्णालयाचे काम रखडले. मात्र, भूमिपूजन झालेल्या या रुग्णालयाचे काम सुरू न झाल्याने खासदार विनायक राऊत यांनी हे रुग्णालय कुडाळमध्ये नेण्याचे संकेत गतवर्षी जुलैमध्ये सावंतवाडीत दिले. त्यानंतर यावरून गदारोळ झाला. रुग्णालय सावंतवाडीव्यतिरिक्त अन्यत्र हलवू देणार नसल्याचा सूर सावंतवाडीतून व्यक्त होऊ लागला. त्याला नंतर राऊत-केसरकर अशा वादाची झालरही देण्यात आली. त्यानंतर या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार राऊत यांनी वेत्ये येथील ग्रामपंचायतीच्या सहा एकर जागेत रुग्णालय उभारणीसाठी विचार व्यक्त केला. ग्रामपंचायतीनेही जागा देण्याची तयारी सुरू केली. त्यानंतरही शहराशिवाय रुग्णालय अन्यत्र होऊ देणार नाही, असा सूर उमटू लागला. केसरकर यांनीही शहरातच रुग्णालय होणार आणि त्यासाठी राजघराण्याचे मन वळवू, असे स्पष्ट केले. तर शिवसेनेने शहरात पालिकेने रुग्णालयासाठी जागा द्यावी, अशी मागणी केली. नगराध्यक्ष संजू परब यांनी शहरातील आरक्षित जागा देण्याची तयारी दर्शविली. परंतु या जागेसाठी अधिक रक्कम द्यावी लागत असल्याने या जागेचा विचार मागे पडला.
राजघराण्याशी केली चर्चा
आमदार दीपक केसरकर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची राजघराण्याशी भेट घडवून जागेसंदर्भात चर्चा केली. राजघराण्याने बाजारभावाने जागेची किंमत द्यावी, असे स्पष्ट केले. त्यानंतर रुग्णालय उभारणी आणि जागेच्या वादासंदर्भात कुठलीही चर्चा आतापर्यंत झालेली नाही. त्यातच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे सध्यातरी रुग्णालय उभारणीचा विषय मागे पडला. आता रुग्णालयाच्या जागेचा
प्रश्न कधी सुटणार आणि रुग्णालय कधी उभारणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. या लाटेत आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. हॉटेल, शाळा या ठिकाणी रुग्णालये उभारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अधिकाधिक सक्षम करण्याची कल्पना पुढे येत आहेत. परंतु जागेच्या प्रश्नामुळे अशी रुग्णालये उभारणीत अडचणी येत असतील तर सक्षम आरोग्य यंत्रणा कशा उभ्या राहतील, हा प्रश्न आहे.
हे कुणाचे अपयश?
सावंतवाडीत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणी झाली असती तर अधिक चांगल्या आरोग्य सुविधा नागरिकांना मिळाल्या असत्या. तसेच भूमिपूजन झालेल्या रुग्णालयाची दोन वर्षानंतर साधी वीटही लागत नसेल तर हे कुणाचे अपयश म्हणावे, असा प्रश्न आहे. त्यामुळे आतातरी याबाबत योग्य पर्याय काढून रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी आमदार केसरकर यांनी पुढाकार घेतला पाहिजे. जेणेकरून सावंतवाडी आणि जिल्हय़ातील जनतेला चांगल्या सुविधा मिळतील.
सावंतवाडीत उभारण्यात येणाऱया या रुग्णालयाचा आराखडा तयार झाला होता. या रुग्णालयात हृदरोग, कॅन्सर यासारख्या गंभीर आजारावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार होणार होते. उपचारासाठी रुग्णांना पुणे, मुंबई फेऱया माराव्या लागतात. त्यात आर्थिक आणि वेळेचे नुकसान होते, ते टळणार आहे.