विमानतळाच्या नूतनीकरणानंतर प्रथमच एअरबस दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे आपल्या मूळ गावी मलेशिया येथे परतलेले विद्यार्थी शनिवारी पुन्हा बेळगावमध्ये शिक्षणासाठी दाखल झाले. दोन विशेष विमानांनी 132 विद्यार्थी बेळगावमध्ये आणण्यात आले. विमानतळाच्या नूतनीकरणानंतर पहिल्यांदाच एअर बस बेळगावमध्ये उतरली. वॉटर सॅल्यूट देऊन या विमानांचे भव्य स्वागत करण्यात आले. 180 आसन क्षमता असणारे विमान उतरल्याने भविष्यात गर्दीच्या मार्गावर बेळगावमधून एअरबस सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
केएलई मेडिकल कॉलेजमध्ये जगभरातील अनेक देशांमधून विद्यार्थी शिक्षण घेतात. मलेशिया येथील सरकारशी करार केल्यामुळे अनेक मलेशियन विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. परंतु लॉकडाऊनमध्ये हे विद्यार्थी मलेशिया येथे परतले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा हे विद्यार्थी बेळगावमध्ये परतले आहेत. चेन्नई विमानतळावर तपासणी करून त्यांना बेळगावमध्ये आणण्यात आले.
दोन एअरबसनी विद्यार्थी दाखल
इंडिगो कंपनीची दोन विमाने या विद्यार्थ्यांना घेऊन बेळगावमध्ये दाखल झाली. विमानतळाच्या नूतनीकरणानंतर धावपट्टीवर एअरबस व बोईंग विमाने उतरतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु या धावपट्टीवर एअरबस उतरली नव्हती. अखेर विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एअरबस प्रथमच विमानतळावर आली आहे. यामुळे एअरबस व बोईंग विमाने लवकरच उतरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यापैकी एक विमान क्वालालंपूर ते चेन्नई व तेथून बेळगावमध्ये दाखल झाले. दुसरे बेंगळूरवरून बेळगावमार्गे हैदराबादला रवाना झाले.
दिवसभरात हैदराबादला 9 विमानांची ये-जा
शनिवारी एका दिवसात हैदराबाद शहराला 9 विमानांची ये-जा होत होती. दररोजच्या विमानांसोबत स्पेशल विमान आल्याने विमानांच्या संख्येत वाढ झाली. बेळगाव विमानतळावरून 4 विमाने हैदराबादला गेली, तर 5 विमाने हैदराबादवरून बेळगावमध्ये दाखल झाली. यामुळे दिवसभरात बेळगाव विमानतळावरून फेऱयांमध्ये वाढ झाली होती.









