नियतीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या कुटुंबातील वृद्धाची आर्त याचना :
भरत सातोस्कर / वेंगुर्ले:
‘मला अनाथाश्रमात नेऊन सोडा, तिथे तरी सुखाने राहीन’, अशी विनवणी करतोय एक वृद्ध बाप.. निराधार बनलेला हा वृद्ध कोण देईल ते खाऊन दिवस काढतोय.. मुलाच्या दारुच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब दुष्टचक्रात सापडले.. घर आहे, पण अन्न नाही.. अखेर नियतीपुढे हतबल होऊन म्हातारपण तरी थोडेफार सुरळीत जाण्यासाठी हा वृद्ध याचना करीत आहे.
मन हेलावणारी ही कहाणी आहे, तुळस-सिद्धार्थनगर येथील विश्राम तातोबा मठकर (84) यांच्या कुटुंबाची. मठकर यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, दोन मुलगे, सून व नात असा परिवार. मठकर हे कातभट्टीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांची पत्नी बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तू विकून त्यांना हातभार लावत असे. पोटाला चिमटा काढून त्यांनी मोठा मुलगा तातोबा याला बारावीपर्यंत शिक्षण दिले. तर लहान मुलगा प्रसाद याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेऊनही कामधंदा नसल्याने मोठा मुलगा तातोबा हा वडिलांबरोबर कात भट्टीवर कामासाठी जाऊ लागला. तर लहान मुलगा प्रसाद याला दहावीनंतर कामासाठी वडिलांनी मुंबईत नातेवाईकांकडे पाठविले. मिळेल ती भाजी-भाकरी खाऊन जगणाऱया या कुटुंबाच्या नशिबात पुढे काय लिहून ठेवले होते, याची कल्पनाच त्यांना नव्हती. कातभट्टीवर काम करणाऱया मोठय़ा मुलाला दारुचे व्यसन लागले. तो दारुच्या एवढा आहारी गेला की, कामधंदा सोडून दारुसाठी आई-वडिलांकडे पैसे मागू लागला. पैसे न दिल्यास तो आई-वडिलांना शिवीगाळ करू लागला.
लहान मुलाचे अपघातात निधन
मुंबईत रोजगारासाठी गेलेला विश्राम मठकर यांचा लहान मुलगा प्रसाद मठकर (20) हा रेल्वेने कामावर जाताना रेल्वेतून पडल्यामुळे मुलुंड स्टेशन येथे त्याचा मृत्यू झाला. हे वृत्त समजताच मठकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मोठय़ा मुलाला दारुचे व्यसन, अन् लहान मुलाचे अपघातात निधन यामुळे मठकर कुटुंब पूर्णपणे खचले. मुलाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी मुंबईतील एका वकिलाने रेल्वे मंडळावर दावा दाखल करून रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळवून दिली. आपल्या आई-वडिलांना भरपूर पैसा मिळाला आहे, असे मोठय़ा मुलाला समजताच तो कामधंदा सोडून दारू पिऊ लागला.
दारू सोडण्यासाठी केले प्रयत्न
मुलाने दारू सोडावी, यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विश्राम मठकर यांनी मुलाला पुणे येथील दवाखान्यात नेले. औषधोपचार केल्यावर मुलगा सुधारेल, मग त्याचे लग्न करावे, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यानंतर त्याचे लग्नही केले. नातूही झाला. मात्र, त्यानंतर हा मोठा मुलगा दारुसाठी पैसे न दिल्यास आई-वडिलांना मारण्याची धमकी देऊ लागला.
…अन आईचा मृत्यू
एक दिवस त्याने आईकडे पैशांसाठी तगादाच लावला. आईने पैसे न दिल्यामुळे त्याने तिला मारले. यावेळी आईचे पायरीवर डोके आपटल्याने गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांत मुलावर भा. दं. वि. कलम 302 चा गुन्हा दाखल झाला. तो जेलमध्येही गेला. तब्बल 18 महिने जेलमध्ये राहिल्यानंतर तो घरी आला. मात्र, त्याची पत्नी मुलासह माहेरी निघून गेली होती.
मोठय़ा मुलाचाही अपघातात मृत्यू
पत्नी व मुलाला आणण्यासाठी मोठा मुलगा सासुरवाडीला गेला. मात्र, त्याला पत्नी व मुलाला नेण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्याने सावंतवाडीत येत दारू प्राशन केली. रात्री दारुच्या नशेत चालत असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
वडिलांजवळ अंत्यसंस्कारासाठीही नव्हते पैसे
मुलाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही वडिलांजवळ पैसे नसल्यामुळे तुळस येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने मदत करीत पार्थिव तुळस गावी आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.
वीज वितरण कंपनीने तोडले कनेक्शन
लहान मुलगा, पत्नी, मोठा मुलगा यांचा मृत्यू झाल्यामुळे विश्राम मठकर हे निराधार झाले. शेजारी, ग्रामस्थ त्यांना जेवण देत आहेत. तर कधी उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. इंदिरा आवास योजनेतून बांधलेल्या त्यांच्या घराचे वीजबिल थकले होते. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने वर्षाचे वीज बिल न भरल्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले. एकूणच विश्राम मठकर यांच्या जीवनात अंधार पसरला असून पुढील वृद्धापकाळ कसा जाणार, याचीच चिंता त्यांना आहे.









