प्रतिनिधी/ बेळगाव
असोगा येथे मलप्रभा नदीकाठावर नागरिकांनी टाकून देण्यात आलेल्या देव-देवतांची भग्न छायाचित्रे जमविण्याची मोहीम राबविण्यात आली. येथील सामाजिक कार्यकर्ते विरेश हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा उपक्रम राबविला.
असोगा परिसरात पवित्र नदीकाठावर भग्य झालेली छायाचित्रे टाकून देण्यात आली आहेत. या परिसरात रामलिंगेश्वराचे जागृत देवस्थान आहे. अशा पवित्र ठिकाणी देव-देवतांचा अपमान करु नये. छायाचित्रे भिन्न झाल्यानंतर नागरिकांनी त्या झाडाखाली, नदीकाठावर किंवा कचऱयात टाकून अपमान करु नये, असे आवाहन विरेश हिरेमठ यांनी केले.
पवित्र भावनेने छायाचित्रांचे पूजन केले जाते. त्याची काच तुटली किंवा भिन्न झाली की कचऱयात टाकून अपमान केले जाते. आपण ही छायाचित्रे जमवून धार्मिक विधीविधानाप्रमाणे त्याचे विसर्जन करतो, असेही विरेश यांनी सांगितले. यावेळी विश्वनाथ सुतार, शुभम पाटील, विठ्ठल मणगुतकर, सागर कोलिंदेकर, परशराम मोरे, मोहन नंदगडकर, भीकाची मादर, मायु पाटील, मोहन मादार, युवराज कुट्रे आदी उपस्थित होते.









