पुढील निवडणुकांसाठी बळ मिळाल्याने सीमाभागात नवचैतन्य : मत विभागणी झाल्यामुळे एकूण मतांच्या संख्येत घट
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषिकांवर वारंवार केले जाणारे अन्याय तसेच प्रशासनाने सुरू केलेली भाषिक गळचेपी यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठी उमेदवार उभा करावा, अशी मागणी होत होती. या काळात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीने संपूर्ण सीमाभागात नवचैतन्य निर्माण झाले. शुभम यांनी मोजक्मया दिवसात केलेल्या झंझावाती प्रचारामुळे त्यांना निवडणुकीत मोठे यश मिळाले. तब्बल 1 लाख 17 हजार 174 मते मिळवत शुभम यांनी सीमाभागात नवा इतिहास घडविला.
मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी गावागावात गल्लोगल्ल्यांमध्ये जाऊन प्रचार केला. हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा केलेला अवमान, महानगरपालिकेसमोर लावण्यात आलेला अनधिकृत ध्वज यामुळे सीमाभागात प्रशासनाच्या विरोधात चिड निर्माण झाली होती. त्यामुळेच शुभम शेळके यांना मोठा प्रतिसाद मिळाला. शेळके यांना प्रचारादरम्यान मिळणारा प्रतिसाद उदंड असल्यामुळे राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना घाम फुटला होता. बलाढय़ राष्ट्रीय पक्षांना शुभम यांनी कडवी झुंज दिली. यामुळे सीमावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शुभम शेळके यांनी बेळगाव शहरासोबत ग्रामीण भागात प्रचारफेऱया व कॉर्नर सभा घेतल्या. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जाहीर प्रचार सभेने तर एक वेगळीच ऊर्जा मिळाली होती. या निर्माण झालेल्या वातावरणामुळे शुभम शेळके यांना एकगठ्ठा मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे न झाल्याचे दिसून आले. सभांना होणारी गर्दी पाहता दीड लाखाहून अधिक मताधिक्मय मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु मत विभागणी झाल्यामुळे एकूण मते घटल्याचे दिसून आले.
पुढील निवडणुकांसाठी मिळाले बळ
म. ए. समितीच्या उमेदवाराने बेळगाव उत्तर, दक्षिण व ग्रामीण या मतदार संघांमध्ये भरघोस मते घेतली. मराठी भाषिकांनी शुभम शेळके यांना दिलेल्या मतांमुळे मराठी भाषिकांचा आत्मविश्वास वाढला आहे. येत्या काळात बेळगाव महानगरपालिका, तालुका पंचायत, जिल्हा पंचायतीच्या निवडणुका असल्याने या निवडणुकांमध्ये मराठी भाषिकांना मोठे यश मिळेल, असा विश्वास आता व्यक्त होऊ लागला आहे. लोकसभा पोटनिवडणुकीमुळे पुढील निवडणुकांसाठी बळ मिळाल्याने मराठी भाषिक एकीने सर्व निवडणुकांना सामोरे जातील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सिंहाने मोडला सिंहाचा विक्रम
म. ए. समितीने 1998 मध्ये लोकसभा निवडणुकीत माजी उपमहापौर ए. पी. पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांनी 1 लाख 7 हजार मते घेतली होती. त्यांचे निवडणुकीचे चिन्ह सिंह हेच होते. शुभम शेळके यांचेही सिंह चिन्ह होते. त्यांनी एकूण 1 लाख 17 हजार 174 मताधिक्मय घेऊन ए. पी. पाटील यांच्या मतांचा विक्रम मोडीत काढला. त्यामुळे सिंहानेच मोडला सिंहाचा विक्रम अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.









