माजी आमदारांच्या वक्तव्याचा म. ए. समितीकडून निषेध
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी भाषिकांच्या मतांवर दोनवेळा आमदारकी उपभोगलेल्या माजी आमदारांनी मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकली. केवळ मतदानासाठी मराठी भाषिकांचा वापर करून घेणाऱया राष्ट्रीय पक्षांचा कुटील डाव समोर आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांमध्ये चमकोगिरी करणाऱया मराठी भाषिकांनी आता तरी हा डाव ओळखून म. ए. समितीच्या झेंडय़ाखाली एकत्रित येणे आवश्यक आहे. माजी आमदारांनी मराठी भाषिकांविरुद्ध केलेले वक्तव्य चुकीचे असून त्याचा शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने निषेध करण्यात आला आहे.
विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना माजी आमदार संजय पाटील यांची जीभ पुन्हा घसरली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात लावण्यात आलेले फलक हे मराठी भाषिकांनी लावले असून, असे हीन कृत्य भाजपचे कार्यकर्ते करणार नाहीत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या त्यांच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध केला जात असून, ज्या मतांच्या आधारे आमदारकी मिळाली त्याच मराठी भाषिक मतदारांना हीन समजणे हे अत्यंत चुकीचे आहे. जी संस्था ते चालवत आहेत, त्या संस्थेच्या जागेची परवानगी कट्टर मराठी भाषिक असणारे सायनाक यांच्यामुळे मिळाली आहे. याचे विस्मरण संजय पाटील यांना झाले आहे. हा कृतघ्नपणा त्यांनी करू नये, असेही समितीने स्पष्ट केले आहे.
एरव्ही मी मराठी असल्याचा डंका पिटविणाऱया माजी आमदारांनीच मराठी भाषिकांना तुच्छ लेखल्याने त्यांच्या विरोधात गावागावात निषेध होत आहे. त्यामुळे जे मराठी भाषिक राष्ट्रीय पक्षांमध्ये आहेत, त्यांनी हा कुटील डाव ओळखून स्वगृही परतावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी केले आहे.









