आपल्या ‘कोर्ट’ या चित्रपटाद्वारे 2014 साली पदार्पण करणाऱया दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेने पहिल्याच चित्रपटाला मोठे यश मिळवले. ‘कोर्ट’ने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. त्याचवषी भारतातर्फे या चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकनही घडले. जगभरातील 18 पुरस्कारांवर कोर्टचे नाव कोरले. आता व्हेनिस चित्रपट महोत्सवात चैतन्यचा ‘शिष्य’ हा दुसरा मराठी चित्रपट गाजणार आहे. महोत्सवाच्या गोल्डन लायन पुरस्काराचा ‘शिष्य’ मोठा दावेदार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत समांतर सिनेमाची चैतन्य लाट आलेली असतानाही मराठी प्रेक्षक मात्र या साऱया माहितीपासून खूप दूर आहे. आपल्या भाषेतील चित्रपटांचा भारतभर आणि परदेशातही डंका पिटला जात असताना मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही. पण हे दिवसही सरतील अशी अपेक्षा करूया. मराठी चित्रपट म्हणजे कुटुंबप्रधान, समस्याप्रधान, भावनाप्रधान, विनोदी, तमाशापट अशा ओळखीला छेद देण्याचे काम कधी जब्बार पटेल यांच्या सामना, सिंहासन तर कधी सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या दोघी अशा चित्रपटांनी केले. मराठीतसुद्धा समांतर चित्रपट किंवा जागतिक दर्जाचे चित्रपट निर्माण होतात अशी ओळख त्यांनी निर्माण केली. मात्र त्याचे लाटेत रूपांतर करणे या काळात शक्मय झाले नाही. बॉलिवूड अर्थात हिंदीतील व्यावसायिक चित्रपटाचे माहेरघर हे मुंबईत असल्याने मराठीवर सुद्धा अशाच प्रकारच्या चित्रपटांचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते. मात्र 2004 साली आलेल्या ‘श्वास’ चित्रपटानंतर मराठीत सुद्धा समांतर चित्रपटांची लाट आलेली आहे. आजच्या काळातील मराठी दिग्दर्शक, कथाकार, कॅमेरामन आणि मराठीत चित्रपटासाठी पैसा लावण्याची तयारी असणारे निर्माते यांच्यामध्ये निर्माण झालेली ऊर्जा आणि प्रसंगी चित्रपटाच्या पारंपरिक बाजाराकडे दुर्लक्ष करून सिनेमावर लक्ष केंद्रित करणारी पिढी कार्यरत झाली आहे. मराठीसाठी ही अत्यानंदाची गोष्ट आहे. चैतन्य ताम्हाणे यांच्या शिष्य या चित्रपटाद्वारे भारतीय सिनेमाला पुन्हा एकदा जगाचे दार खुलले आहे. यापूर्वी 2011 साली मीरा नायरच्या ‘मॉन्सून वेडिंग’ चित्रपटाने व्हेनिस महोत्सव गाठला होता. 76 वर्षांची परंपरा असणाऱया या महोत्सवाने कोरोनाच्या काळातही भारतीय सिनेमाला आणि मराठीला सुखावलेले आहे. मराठीतील या नव्या लाटेला त्यामुळे बळ मिळाले आहे. 2004 सालच्या संदीप सावंत यांच्या श्वास नंतर उमेश कुलकर्णींचा वळू, विहीर, हायवे, सुमित्रा भावे यांचे बाधा, देवराई, अस्तु, कासव, परेश मोकाशी यांचे हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, नागराज मंजुळे यांचा फॅण्ड्री असे एकापेक्षा एक चित्रपट आले. भारतीय सिनेमांमध्ये आणि जागतिक सिनेमांमध्ये मराठी चित्रपट आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. ही मराठीतील ‘न्यू वेव्ह’ आहे हे बॉलीवूडने सुद्धा जाणले. समांतर चित्रपट चळवळीत भारतीय, प्रादेशिक भाषांमध्ये काम करणाऱया विविध चित्रपटकारांनीही त्याचे कौतुक केले. फॅण्ड्री पाठोपाठ मंजुळे यांचा सैराट चित्रपट आला आणि त्याने व्यावसायिक यशही मिळवले. तब्बल शंभर कोटीचा व्यवसाय केला. असे चित्रपट निर्माण करणाऱया मराठी चित्रपटसृष्टीतील विविध प्रयोगांकडे एरवी डोळेझाक करणाऱया समीक्षकांसहित सर्वांचेच डोळे विस्फारले आणि सैराटच्या निमित्ताने त्यांनी मराठी सिनेमाच्या शक्तीला मान्यता दिली. या दरम्यान अविनाश अरुण यांचा किल्ला, निशिकांत कामत यांचा डोंबिवली फास्ट, चैतन्य कुंटे यांचे हम्पी, सायकल गजेंद्र अहिरे यांचे एक दोन नव्हे तर तब्बल 40 हून अधिक चित्रपट या सगळय़ा घडामोडींकडे लक्ष दिले तर मराठीत चाललेल्या या प्रयोगांमध्ये गेली सोळा वर्षे सातत्य आहे हे दिसते. मात्र या चित्रपटांना प्रेक्षक वर्ग मात्र मनासारखा लाभत नाही ही खंत कायम आहे. काही मोठय़ा बॅनरच्या खर्चामुळे असेल किंवा टीव्ही माध्यमांवरील जाहिरातबाजीमुळे असेल, बऱयाच चित्रपटांना प्रेक्षक लाभला तरी चांगले प्रयोग करणाऱया दिग्दर्शकांची संख्या वाढायची असेल तर त्यासाठी अशा कोणत्याही तकलादू उपायांऐवजी मराठी प्रेक्षक स्वतःहून या लाटेत सहभागी झाला पाहिजे तरच ती खऱया प्रेक्षकांची लाट होणार आहे………. या दृष्टीने चैतन्य ताम्हाणे यांचा कोर्ट किंवा मंगेश जोशी यांचा लेथ जोशी हे चित्रपट जागतिक सिनेमाचा भाग ठरतील अशा उंचीचे आहेत. लाटेचा उच्चांक गाठला जात असताना आणि जगभर कोर्टचे कौतुक होत असताना सुद्धा कोर्ट किंवा लेथ जोशीला चित्रपटगृह मिळालेले नाही. त्यामुळेच असेल कदाचित, पण, या दोन चित्रपटांना सोडून इतर दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटात प्रेक्षकांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न बंद केलेला नाही. अगदी नागराज मंजुळे यांचा आगळावेगळा नाळ सुद्धा त्याला अपवाद नाही. एक आनंदाची गोष्ट म्हणजे, मराठीतील दिग्दर्शक आणि कलाकार आता विविध चित्रपट महोत्सवाला हजेरी लावताना आणि भारतीय आणि जागतिक चित्रपटातील नवनवे प्रयोग अभ्यासताना दिसत आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्याचे संदर्भही येत आहेत ही एक आशादायक बाब आहे. चैतन्य यांच्यासारखा आज 33 वय असणारा युवक वयाच्या चोविसाव्या वषी डोक्मयात एक कथानक घेऊन फिरत होता, चित्रपटाला हवा तितका पैसा नसताना मित्राच्या मदतीने त्याने चित्रपट बनवला. कोर्ट सिनेमातील तंत्रज्ञापासून कलाकारांपर्यंत सर्वच लोक नवखे होते. पण त्यांच्यावर कोणाचा प्रभाव नसल्याचा एक फायदा झाला तो म्हणजे कोर्ट सारखा एक अप्रतिम चित्रपट निर्माण झाला! चित्रपट क्षेत्रात प्रभाव हा गरजेचा असतो मात्र तो सकारात्मक असावा. स्पॅनिश दिग्दर्शक अल्फान्सो क्वारॉन आणि चैतन्य ताम्हाणे यांचेच यासाठीही उदाहरण देण्यासारखे आहे. कला क्षेत्रात काही चांगले घडावे या विचाराने रोलेक्स ही कंपनी एक आंतरराष्ट्रीय कला उपक्रम राबवते. ज्यामध्ये नव्या पिढीतील आश्वासक कलाकार आणि प्रतिथयश व्यक्तीमत्त्व यांची गुरु शिष्य जोडी बनवून त्यांना एक वर्ष एका प्रकल्पात काम करण्याची संधी दिली जाते. त्यासाठीचा खर्च रोलेक्स कंपनी करते. क्वारॉन आणि ताम्हाणे यांनी चित्रपट रोमा साठी एकत्र काम केले. त्याला ऑस्कर मिळाला! क्वारॉन यांनी आपल्या या चित्रपटावर ताम्हाणे यांच्या कोर्टचा प्रभाव पडल्याचे म्हटले आहे. असाच प्रभाव पडून मराठी प्रेक्षक खर्या सिनेमाकडे वळो हीच यानिमित्ताने अपेक्षा. आणि ताम्हाणे यांना शुभेच्छा.
Previous Articleतामिळनाडू राज्यातही 31 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी
Next Article शहरातून पलायन
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








