वारणानगर / प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे मात्र मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे त्यामुळे नुकसान होणार नाही अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली. जनसुराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यावेळी कदम यांनी राज्यपाल कोश्यारी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती, शाळा, कॉलेज व परीक्षांबाबतचा संभ्रम, मराठा आरक्षण आदी विषयावर त्यांच्याशी चर्चा केली.
सध्या कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करण्याबाबत निर्णय घ्यावा. रेमेडेसिव्हर औषधांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता व्हावी. सध्या शालेय व महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या परीक्षा यांमध्ये संभ्रम आहे याबाबत कुलगुरूंशी बैठक घेवून योग्य मार्ग काढू असे आश्वासन राज्यपालांनी दिले.
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व नोकरीत हे नुकसान होणार आहे. याबाबत निर्णय घेण्याची मागणी कदम यांनी केली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही व नोकरीतही नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल असेही आश्वासन राज्यपाल कोश्यारी दिले.