प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची शनिवारी 26 सप्टेंबर रोजी नाशिक येथे अत्यंत महत्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागेतील मधुरम बॅक्वेट हॉलमध्ये होणाऱया या बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला सामोरे जाण्याआधी कायदेशीर सर्व बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी कायदेतज्ञ (विधिज्ञ), घटनातज्ञांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. व्यापक, सर्वदृष्टीकोनातून सखोल चर्चा झाल्यानंतर काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबरला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाजात रोष व्यक्त होत आहे. आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजासाठी आर्थिक दुर्बल घटकाच्या सवलती जाहीर करताना काही सवलतीही घोषित केल्या आहेत. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात आरक्षणावरील स्थगिती उठविण्याची मागणी करणारा विनंती अर्जही दाखल केला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या सवलती आणि तरतुदींच्या पार्श्वभूमीवर आता मराठा समाजात चर्चा सुरू झाली आहे. सवलती आणि तरतुदीचा फायदा आणि तोटा यावर विचार मंथन सुरू झाले आहे. नाशिकच्या बैठकीत या सर्व गोष्टींवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कायदेतज्ञ अर्थात विधिज्ञांचे मार्गदर्शन आणि सल्लाही घेण्यात येणार आहे. बैठकीला राज्यभरातून प्रत्येक जिल्हÎातील मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
ऑनलाईन बैठकीत निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयक, पदाधिकारी यांची बैठक गुरूवारी सायंकाळी झूम ऍपवर ऑनलाईन झाली. बैठकीत राज्य सरकारने जाहीर केलेल्या सवलती, तरतुदी, त्यांचे वास्तावातील फायदे, तोटे तसेच कायदेशीर बाबींचा विचार केल्यास समोर येणाऱया सकारात्मक, नकारात्मक बाबींवर विविध मान्यवरांनी मते मांडली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर नासिकच्या बैठकीत विचार मंथन केल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीला राजेंद्र कोंढरे, पुणे, वीरेंद्र पवार, मुंबई, करण गायकर, नासिक, ऍड. अभिजित पाटील, नवी मुंबई, दिलीप पाटील, कोल्हापूर, प्रवीण पाटील, सांगली, गणेश काटकर, सातारा, जगन्नाथ काकडे, जालना, आप्पा पुडेकर, औरंगाबाद, व्यंटक शिंदे, लातूर, सुचेता जोगदंड, नांदेड, नितीन पवित्रकार, अमरावती, डॉ. अभय पाटील, नागपूर, रवि पाटील, जळगाव, रवि मोहिते, सोलापूर, रूपेश मांजरेकर, रायगड, ऍड. सावंत, सिंधुदुर्ग, मनोज गायके, औरंगाबाद यांच्यासह ऍड. श्रीराम पिंगळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.








