उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र : पेंद्र सरकारने संसदेत विधेयक आणावे
प्रतिनिधी/ मुंबई
जातीपातींमध्ये द्वेषाच्या भिंती उभारून आणि दुहीची बीजे पेरून राजकीय पोळी भाजण्याचे कारस्थान भाजप करीत आहे. मराठा आरक्षणातही मोडता घालण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यात केला. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी पेंद्र सरकारने संसदेत विधेयक आणून आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. मराठा समाजाने आरक्षणासाठी प्रदीर्घ आंदोलन केले, युवक आत्महत्या करीत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे शांततेने आंदोलन करणारऱ्यांवर जालियनवाला बाग हत्याकांडाप्रमाणे अमानुष अत्याचार करण्यात आला. आमच्याही सरकारच्या काळात आंदोलने झाली. पोलिसांना आदेश दिल्याशिवाय ते बळाचा वापर करीत नाहीत. माझ्या काळात
मी कधीच पोलिसांना असे आदेश दिले नव्हते. मग, जालना पोलीस अधीक्षकांना लाठीमाराचे आदेश सरकारमधून कोणी दिले आणि जालन्यातील ’जनरल डायर‘ कोण‘, असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी गफहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
भाजप किंवा जनसंघाने कोणत्याही चळवळीत वा लढयात भाग घेतला नव्हता. त्यांच्यावर लढण्याची वेळ कधीच आली नव्हती. भाजपची मंडळी ज्यांच्याबरोबर जातात त्यांचा सत्यानाश करतात. अशी ही विघ्नसंतोषी मंडळी मराठा आरक्षणात मोडता घालत आहेत, असा आरोप ठाकरे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरून भगव्यात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी सावध रहावे
मनोज जरांगे यांनी भाजपपासून सावध राहावे. भाजपने जातीपातींमध्ये तसेच नेत्यांमध्ये भांडणे लावली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या आदेशाविरोधात दिल्ली सरकारमधील बदल्यांचे अधिकार घेण्यासाठी भाजपने पाशवी बहुमताच्या जोरावर संसदेत विधेयक आणले. त्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठीही विधेयक मंजूर करून समाजाची मागणी पूर्ण करावी, असे मत ठाकरे यांनी मांडले.
भाजप घराणेशाहीच्या आरोपाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, ’मी घराणेशाहीचा पाईक आहे. मला माझ्या घराण्याबद्दल अभिमान आहे. भारताचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड त्यांच्या कतफ&त्वामुळे त्या पदावर आहेत. त्यांचे वडील यशवंतराव चंद्रचूड हेही कर्तव्यकठोर सरन्यायाधीश होते. इतिहासातील उदाहरणे पाहिली, तर हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन, पुतीन अशा सर्व जुलमी नेत्यांना जनतेने सुरूवातीला भरभरून पाठिंबा दिला होता. पण त्यांची राजवट कशी होती? ठाकरे यांनी त्यांची तुलना मोदी राजवटीशी केली. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी यांनी आघाडी सरकार उत्तम चालवले. खुर्ची डळमळीत असेल, तर जनतेच्या मतांनाही किंमत दिली जाते व लोकशाही व्यवस्था टिकते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेने एका पक्षाला पाशवी बहुमत देऊ नये, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
भाजप हा जगातील सर्वात मोठा व शक्तिशाली पक्ष असताना अन्य पक्षातील भ्रष्टाचारी व गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांना भाजपबरोबर का घेत आहेत, त्यांना या नेत्यांची गरज का वाटते, असा सवाल ठाकरे यांनी केला.
निर्लज्ज सदासुखी
जवळपास एक वर्ष होऊन गेले आहे. आमदार अपात्रतेच्या निर्णयासाठी सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. तारखेवर तारीख. काय करायचे तेच कळत नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रत्येकवेळेला लावादाचे कानफाट फोडले जात आहे. पण प्रत्येकवेळेला निर्लज्ज सदासुखी. कानफाट फोडले तरी गाल चोळत सांगतात की आम्ही आमचे वेळापत्रक सादर कऊ. तुम्ही तुमचे वेळापत्रक द्यायचे तेव्हा द्या, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.









