‘मेल्या म्हशीला मणभर दूध’ अशी म्हण आहे. पुढारी किंवा पत्रकार जिवंतपणी ज्यांच्यावर टीका करतात त्यांच्यावरच मरणोत्तर स्तुतीसुमने उधळतात. आचार्य अत्र्यांनी पंडित नेहरूंवर सतत घणाघाती टीका केली. पण नेहरूंचे निधन झाल्यावर ‘सूर्यास्त’ ही नेहरूंना वाहिलेल्या श्रद्धांजलीपर अग्रलेखांची मालिका त्यांनी लिहिली. नेहरूंच्या ठायी असलेल्या विविध गुणांचे, स्वभाव वैशिष्टय़ांचे, प्रज्ञेचे गुणगान करणाऱया या मालिकेतील प्रत्येक अग्रलेख म्हणजे अत्र्यांच्या अद्भुत शैलीचा आविष्कार आहे. श्रद्धांजलीपर लेखांचा विचार केला तर मराठीतला हा विक्रमच म्हणावा लागेल. आजवर कोणत्याही नेत्याला असे नेहरूंप्रमाणे भाग्य निदान मराठीत लाभले नाही.
आपल्याकडे दरवषी सरकारकडून गुणवंत कलाकार, नेते, कार्यकर्ते वगैरेंना पद्म सन्मान दिले जातात. काही वेळा या निवडीबद्दल मतभेद देखील होतात. गेल्या आठवडय़ात यंदाच्या सन्मानमूर्तींची यादी प्रसिद्ध झाली. असे सन्मान प्रतिकात्मक असतात. ते मरणोत्तर द्यावेत का, मरणोत्तर दिल्याने दिवंगत व्यक्तीच्या वारसांना नेमके काय मिळेल, मानसिक समाधान मिळेल की आठवणींची खपली निघेल, वगैरे प्रश्नांची चर्चा वाचली. त्यावरून एक आठवण झाली.
ओ हेन्री लोकप्रिय अमेरिकन लघुकथाकार एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस जन्मला आणि 1910 साली त्याचे निधन झाले. ओ हेन्रीने 600 हून अधिक लघुकथा लिहिल्या. तरुणपणी बँकेत नोकरी करीत असताना त्याच्यावर काही बालंट आले. कोर्टात तो स्वतःचे निरपराधित्व सिद्ध करू शकला नाही. त्याला पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण तुरुंगातील चांगल्या वर्तनामुळे शिक्षेत माफी मिळून तो तुरुंगातून लवकर सुटला. कैदेत असतानाच त्याने कथालेखनाला सुरुवात केली होती. 1962 साली त्याच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियन सरकारने टपाल तिकीट प्रकाशित केले. 2011 साली दोन आरोपींना शिक्षेत सूट देताना बराक ओबामा यांनी ओ हेन्रीचे एक अवतरण उद्धृत केले. त्याचे निमित्त होऊन राज्यशास्त्राचे प्राध्यापक पी. एम. रकमन ज्युनिअर आणि टेक्सासचे टर्नी स्कॉट हेन्सन यांनी ओ हेन्रीला मरणोत्तर दोषमुक्त करावे म्हणून याचिका दाखल केली. 2012 साली त्याची दीडशेवी जयंती होती. त्यानिमित्त अमेरिकन सरकारने टपाल तिकीट प्रकाशित केले. दर वषी सर्वोत्कृष्ट कथा संग्रहाला ओ हेन्रीच्या नावाने पुरस्कार मिळतो. यातून ओ हेन्रीच्या आत्म्याला किंवा वारसांना काय मिळत असेल, पण देणाऱयांना कृतज्ञतेचा आनंद नक्की मिळत असणार!
Previous Articleयादव शृंगारले सकळ
Next Article ‘छपाक’ छाप…
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.