दोघांना अटक व सुटका, पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा डाव. गावकऱयांमध्येच फुट पाडण्याचा प्रयत्न. स्थानिक ट्रकवाल्यांना रस्त्यावर उतरवून घडविला वाद. खनिज वाहतूक बेकायदेशीरच – स्थानिकांचा दावा.

डिचोली/प्रतिनिधी
मये गावातील रस्त्यांची परिस्थिती योग्य नसल्याने स्थानिकांनी बंद केलेली खनिज वाहतूक काल मंगळ. दि. 22 मार्च रोजी सकाळी गावकरवाडा मये येथे स्थानिकांनी पुन्हा अडवली. मात्र पोलीस बळाचा वापर करून सदर आंदोलनातील दोघांना अटक करण्यात आली आणि वाहतूक सोडण्यात आली. गेले अनेक दिवस या वाहतुकीसाठी मये गावाबाहेरील ट्रक वापरण्यात येत होते. मात्र काल मये, पैरा, शिरगाव या भागातील ट्रक आणून खनिज वाहतूक करण्याची शक्कल लढविण्यात आली. त्यामुळे आंदोलनकर्ते आणि ट्रकवाले यांच्यातच वाद झाला. याचाच लाभ उठवत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मयेतील रस्त्यांची स्थिती धोकादायक असल्याने या रस्त्यावरून होणाऱया खनिज वाहतूकीला मयेतील लोकांनी वारंवार विरोध केला आहे. अनेकवेळा गावात सदर खनिज वाहतूक अडवून धरली आहे. त्यामुळे त्यांना अटकही झाली आहे. या विषयी अनेकवेळा डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठकाही झाल्या. तशीच एक बैठक सोम. दि. 21 मार्च रोजी डिचोली उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर यांच्या कार्यालयात झाली. परंतु सदर बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता. तर स्थानिकांनी मये गावातून बेकायदेशीर खनिज वाहतूक झाल्यास ती आम्ही अडवणारच अशी भुमिका घेतली होती. खनिज मालाच्या वाहतुकीसाठी मये गावातील रस्ता अधिसुचित करण्यात आलेला नसल्याने या रस्त्यावरून खनिज वाहतूक करू न देण्याच पवित्रा घेण्यात आला होता.
तत्पूर्वी 18 मार्च रोजी गावकरवाडा मये येथे झालेल्या जाहिर सभेत मयेचे आमदार, सरपंचा, पंचसदस्य यांनी हि वाहतूक मयेतून होऊ देऊ नये यासाठी घेतलेल्य ठरावांना अनुमोदन दिले होते. आणि आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सोमवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयात सदर बैठकही पार पडली. मात्र त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता.
सकाळी मयेत अडविण्यात आली खनिज वाहतूक
मयेतील लोकांचा विरोध असतानाही काल मंगळ. दि. 22 मार्च रोजी सकाळी मये गावातील रस्त्यावरून खनिज मालाच्या वाहतुकीला प्रारंभ झाला. सदर वाहतूक करणारे ट्रक गावकरवाडा मये येथे मये भु विमोचन नागरीक कृती समातीचे अध्यक्ष सखाराम पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी अडविले. ते अडविण्यात आल्यानंतर मयेत महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा परूळेकर या इतर पोलिसांसह दाखल झाल्या. त्यांच्याशी चर्चा करताना आंदोलनकर्त्यांनी या वाहतूकीसाठी मयेचा रस्ता अधिसूचित असल्याचा पुरावा दाखवावा. तसेच खनिज वाहतूक योग्य नियम पाळून करण्यात आल्यास आमची काहीच हरकत नसल्याचे सांगितले. यावेळी एका ट्रकचालकाने आपणास मारहाण केल्याची तोंडी तक्रार पोलिसांकडे केली.
पोलीस निरिक्षकां?नी दोघांना घेतले ताब्यात
त्यानंतर डिचोली पोलीस निरिक्षक महेश गडेकर हे पोलीस फौजफाटय़ासह गावकरवाडा मये येथे दाखल झाले. त्यांनी दाखल होताच आंदोलनकर्त्यांना फैलावर घेण्यास सुरूवात केली. मारहाण झालेल्या ट्रकचालकाला मारहाण केल्याप्रकरणी सखाराम पेडणेकर यांना बरूच सुनावले. वाहतूक अडवाण्याचा अधिकार तुम्हाला आहे का ? असा प्रश्न त्यांना विचारत त्यांना ताब्यात घेतले. यावेळी सखाराम पेडणेकर यां?नी आपण रस्त्याच्या बाजूला असताना संबंधित ट्रकचालकाने आपल्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. अशी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांनाच प्रतिप्रश्न करीत ताब्यात घेतले. यावेळी या घटनेचे चित्रिकरण करणाऱया एका पत्रकारावरही निरिक्षक गडेकर भडकले व त्याला बाजूला राहण्याची सुचना केली. त्यावर सदर पत्रकाराने “राहतो पण ओरडू नका” असे सांगताच “माझे काम ओरडण्याचेच” असे म्हणत निरिक्षकांनी पुढे कुच केली.
आमदार, सरपंच, पंचसदस्यांची दडी
मयेतून आनिज वाहतूक होऊ देणार नाही, या ठरावाला सर्वांसमक्ष अनुमोदन दिलेले मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंचा सीमा आरोंदेकर व अन्य पंचसदस्य काल खनिज वाहतूक अडविल्यानंतर घटनास्थळी आलेच नाही. तर केवळ पंचसदस्य कृष्णा परब, युवानेते संतोषकुमार सावंत हेच घटनास्थळी उपस्थित होते. या प्रकाराचा सखाराम पेडणेकर यांनी निषेध करताना तीव्र नाराजी व्यक्त केली. गावातील स्थानिक ट्रकवाल्यांना रस्त्यावर उतरवून स्थानिक लोक व ट्रकवाले यांच्यातच वाद पेटविण्याचा डाव राजकारण्यां?नी आखला आणि त्यात ते यशस्वी झाल्याची टिका त्यांनी केली. तसेच बेकायदेशीर खनिज वाहतूक करणाऱया वाहतूक कंत्राटदाराविरोधात कोणतीही कारवाई न करता त्यांना अभय देण्याचे काम पोलिसांनी केले. असेही सखाराम पेडणेकर यांनी यावेळी म्हटले. आणि संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला.
सामान्य लोकांनी न्याय मागावा तरी कोणाकडे ?
मये गावातील रस्त्यांची स्थिती सध्या नाजूक असल्याने या गावातील रस्त्यावरून खनिज वाहतूक नको अशी भुमिका गावातील लोकांनी घेतली आहे. त्यानुसार खनिज वाहतूक अडवत असल्यास त्यांच्याच विरोधात शासकीय यंत्रणांद्वारे अन्याय केला जात आहे. उलट स्थानिकांनाच न्यायालयात जाऊन वाहतुकीला स्थगिती आणण्याची सुचना पोलीस व उपजिल्हाधिकारी देत आहेत. अशा प्रकरणांविरोधात स्थानिकांनी न्यायालयात जाण्याची सुचना सरकारी अधिकारीच देत असल्यास लोकांनी सरकारकडे नव्हे तर न्याय मागावा तरी कोणाकडे ? अशा परिस्थितीत सरकारने मध्यस्थी करून लोकांचे हित व मागणी जपण्याची आवश्यकता असते. पण सरकारच याकडे बेफिकीरपणा दाखवत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. असे यावेळी मयेतील युवानेते संतोषकुमार सावंत यांनी म्हटले.
या मागील मास्टरमाइंड पडद्याआड ? उपलब्ध माहिती मयेतून खनिज वाहतूक करण्याची जबाबदारी एका पंचसदस्याने घेतली आहे. अशी चर्चा य आंदोलनावेळी रंगली होती. सदर पंचसदस्याने वाहतूक कंत्राटदाराशी संगनमत करून वाहतूक करण्याचा विडा उचलला आहे. आतापर्यंत या वाहतुकीसाठी मये, पैरा, शिरगाव या भागातील ट्रकांना समाविष्ट केले जात नव्हते. मात्र मयेतील आंदोलक आक्रमक बनल्यानंतर मये, शिरगाव, पैरा गावातील ट्रकवाल्यांना तयार करून बाहेरील ट्रकांना मज्जाव करण्यात आला. त्यामुळे आंदोलनकर्ते आणि ट्रकमालक चालक यांच्यातच खनिज वाहतूक अडवाताच वाद घडवून आणण्याचा त्यांचा बेत सफल झाल्याचे बोलले जात होते. या प्रकरणावरून सदर पंचसदस्याला मात्र उपस्थितांनी शिव्यांची लाखोली वाहिली.









